आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशने खुली केली गुंतवणुकीची कवाडे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशातील अव्वल पसंतीच्या तीन गुंतवणूक स्थानांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी मध्य प्रदेश सज्ज झाला आहे. गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक गुंतवणूकदाराला उद्योग उभारण्यासाठी सर्व प्रकारचे पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यात येईल, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येत्या काही वर्षांत मध्य प्रदेश हे तुमचे पसंतीचे गुंतवणूक राज्य बनेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
सीआयआय, मध्य प्रदेश सरकार आयोजित ‘मध्य प्रदेशातील गुंतवणुकीच्या संधी’ या विषयावरील परिसंवादात मुख्यमंत्री चौहान यांनी गुंतवणूकदार, व्यावसायिकांशी संवाद साधला. युनो पुरस्कारप्राप्त मध्य प्रदेश सार्वजनिक सेवा हमी कायद्यांतर्गत गुंतवणूक प्रोत्साहन यंत्रणा राबवतानाच राज्यात गुंतवणूकदारांना येणारे सर्व अडथळे दूर करण्यात येतील. उद्योजकांच्या मदतसाठी आपण स्वत: सोमवार-मंगळवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत उपलब्ध राहू, असे ते म्हणाले. गुंतवणूकदारांना आपल्या कार्यालयात येण्याचे खुले आमंत्रणही त्यांनी दिले. राज्यातील रोजगार निर्मिती व आर्थिक विकासामध्ये औद्योगिकीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे 2014 पर्यंत पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येईल. पाच वर्षांत 12 टक्क्यांपेक्षा जास्त विकास साध्य करतानाच 2015 पर्यंत कृषी क्षेत्रात मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकाचे राज्य बनेल, असे प्रतिपादन चौहान यांनी केले.
राज्याने मागील आर्थिक वर्षामध्ये कृषी क्षेत्रात 18 टक्के, दुग्ध व्यवसायात 22 टक्के व औद्योगिक क्षेत्रात 8 टक्के वाढीची नोंद केली. 2005 ते 2010 या कालावधीत 10.20 टक्के संकलित विकास वाढ साधला. एडीएजीचे अध्यक्ष अनिल अंबानी, टाटा समूहाचे उपाध्यक्ष सायरस मिस्त्री, एस्सार समूहाचे अध्यक्ष शशी रुईया आणि अन्य अनेक बड्या कंपन्यांचे अधिकारी या परिषदेला उपस्थित होते.