नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने कर्जाच्या किमान व्याजदरात ०.१५ टक्के कपात केली आहे. महाबँकेने कर्जाचे व्याजदर १०.४० टक्क्यांवरून १०.२५ टक्के केले आहेत. नवे व्याजदर १५ डिसेंबरपासून लागू होतील. यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रचे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होणार आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यापारी बँकांना कर्ज स्वस्त करण्याचे आवाहन केले होते. दोन डिसेंबरला रिझर्व्ह बँकेने पतधोरण आढावा जाहीर केला त्यावेळी प्रमुख व्याजदर जैसे थे ठेवताना बँकांनी कर्ज स्वस्त करण्याचे आवाहन केले होते. राजन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्ज स्वस्त करणारी बँक ऑफ महाराष्ट्र ही पहिली बँक ठरली आहे. बँकेने कर्जाचे मूळ दर ०.१५ टक्क्यांनी कमी करण्याचे ठरवले असून नवा आधार दर १०.२५ टक्के राहील, असे बँक ऑफ महाराष्ट्रने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. नवे व्याजदर १५ डिसेंबर २०१४ पासून लागू होतील.
एसबीआयचे संकेत
स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकतेच
आपल्या निवडक एफडींवरील व्याजदर कमी केले .त्यावेळी कर्ज स्वस्त करण्याचे संकेत एसबीआयच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी दिले. मुदत ठेवींवरील व्याजदर जास्त असेल तर कर्जाचे व्याजदरात कपात करणे कठीण असते, असे त्यांनी सांगितले होते.