आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra: Alphonso Mangoes May Cost Less This Year

यंदा हापूस स्वस्त, राज्य सरकारचा वाहतूक खर्च कमी करण्यासाठी पुढाकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मे महिना जवळ येताच पिवळाधम्मक हापूस बाजारात दिसायला लागतो. पण आंब्याचा भाव बघून नाइलाजाने खरेदीचा हात आखडता घ्यावा लागतो. यंदाच्या मे महिन्यात मात्र तसे होण्याची शक्यता कमी आहे. राज्य सरकारने आंब्याच्या वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी विशेष पुढाकार घेतल्यामुळे यंदा आंबा ग्राहकांसाठी थोडाफार स्वस्त होण्याचा अंदाज आहे. यामुळे आंब्याचा वाहतूक खर्च 8 ते 10 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.

कृषी खात्याने दिलेल्या प्रस्तावानुसार कोकणात पिकणारा आंबा थेट जहाजाने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टवर उतरवण्याचा विचार करण्यात येत आहे. हा आंबा पहिल्यांदा जयगड बंदरात कंटेनरमध्ये चढवला जाऊन तेथून तो थेट जेएनपीटी बंदरात उतरवला जाईल. हा आंबा निर्यातीसाठी पाठवायचा, बाजार समितीकडे धाडायचा की, थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा हा पर्याय असेल.

सर्वांचा फायदा
सध्या आंब्याची वाहतूक कोकणातून ट्रकमधून होत असल्यामुळे फळाच्या दर्जावर परिणाम होतो. त्याचप्रमाणे इंधन तसेच हाताळणी खर्चात वाढ झाल्यामुळे हापूसची किमत वाढते, असेही या अधिकार्‍या ने सांगितले. शेतकर्‍यांनादेखील कृषी उत्पन्न बाजार समितीत 6 टक्के अधिभार भरावा लागतो. आंबा उत्पादक थेट त्यांची उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचू शकणार असल्याने त्याचा फायदा ग्राहकांबरोबरच उत्पादकांना होऊ शकणार आहे.