मुंबई - ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशातून स्थापन झालेल्या महाराष्ट्र ग्रामीण बॅँकेने नवीन आर्थिक वर्षासाठी कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार यंदाच्या वर्षात 20 नवीन शाखा उघडण्याचा संकल्प बॅँकेने सोडला आहे.
नांदेड येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पाच हजार कोटी रुपयांच्या ठेवी संकलनाबरोबरच 3,650 कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे लक्ष्य बॅँकेने ठेवले आहे. त्याचबरोबर 8,650 कोटी रुपयांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे बॅँकेचे अध्यक्ष फिलीप डिसिल्व्हा यांनी या वेळी सांगितले.
केंद्र सरकार. महाराष्ट्र सरकार आणि बॅँक आॅफ महाराष्ट्र यांचे भागभांडवल असलेली ही राष्ट्रीयीकृत बॅँक असून रिझर्व्ह बॅँकेचा शेड्युल्ड दर्जा मिळाला आहे. मागील आर्थिक वर्षात बॅँकेने 27 नवीन शाखा उघडल्या. महाराष्ट्र ग्रामीण बॅँकेचे 23 लाख खातेदार असून 3 लाख 40 हजार कर्ज खातेदार आहेत.
मराठवाड्यातल्या मागसलेल्या जिल्ह्यातील प्रगतीचा आढावा घेता मागील आर्थिक वर्षात 1 लाख बासष्ट हजार शेतकर्यांना 923.62 कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरण करण्यात आले. बॅँकेने प्राथमिक कर्ज वाटपाला महत्त्व दिले असून त्याचे एकूण कर्जाशी 90.40 टक्के असे प्रमाण आहे. शासनाच्या थेट लाभ हस्तांतर सुविधा बॅँकेत उपलब्ध करून दिली आहे.