आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra On Top For Attracting Foreign Tourist In India

सर्वाधिक व‍िदेशी पर्यटक आकर्षित करण्यात महाराष्‍ट्र अव्वल स्थानावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पर्यटन क्षेत्रातून देशाला मिळणा-या विदेशी चलन उत्पन्नात वार्षिक 13 टक्के वाढ होऊन 2015 पर्यंत ते 26 अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज ‘असोचेम’ या संस्थेने व्यक्त केला आहे. सध्या हे उत्पन्न वर्षाला 20 अब्ज डॉलर आहे. विविध राज्यांमध्ये सर्वाधिक पर्यटक आकर्षित करण्यात महाराष्‍ट्र अव्वल स्थानावर असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे.


सध्या देशात येणा-या विदेशी पर्यटकांची संख्या 70 लाखांच्या आसपास असून पुढील तीन वर्षांत सात टक्के संकलित वार्षिक वाढ नोंदवत ती 80 लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. गुरुवारी साज-या होत असलेल्या जागतिक पर्यटन दिनाच्या पार्श्वभूमीवर असोचेमने केलेल्या एका विश्लेषणामध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


राज्यनिहाय करण्यात आलेल्या विश्लेषणामध्ये महाराष्ट्रासह तामिळनाडू, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थान ही विदेशी पर्यटकांच्या पसंतीची पाच टॉप पर्यटन ठिकाणे आहेत. देशाला भेट देणा-या एकूण विदेशी पर्यटकांमध्ये या पाच राज्यांत जवळपास 70 टक्के विदेशी पर्यटक येत असल्याचे दिसून आले आहे.


सध्याचे चालू खात्यातील तुटीचे वाढते प्रमाण लक्षात घेता पर्यटनाच्या माध्यमातून मिळालेल्या विदेशी चलनाला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे ‘व्हिसा’विषयक नियम आणखी सुलभ करून विदेशी पर्यटकांचा ओघ जास्तीत जास्त वाढवण्याच्या दृष्टीने सरकारने विचार केला पाहिजे. त्याचबरोबर पर्यटन क्षेत्रातील सहकार्याला बळकटी देण्यासाठी विविध देशांबरोबर करार करणेही गरजेचे असल्याकडे रावत यांनी लक्ष वेधले.


पेट्रोलियम (60.8 अब्ज डॉलर), हिरे आणि दागिने (43.3 अब्ज डॉलर), वाहतूक उपकरणे (18.3 अब्ज डॉलर) या तीन निर्यात क्षेत्रानंतर देशाला सर्वाधिक विदेशी चलन मिळवून देण्यामध्ये पर्यटन उद्योग (17 अब्ज डॉलर) चौथ्या स्थानावर असल्याचे असोचेमने म्हटले आहे.


पसंतीची अव्वल पाच राज्ये
महाराष्‍ट्र 25 टक्के
तामिळनाडू 17 टक्के
दिल्ली 11 टक्के
उत्तर प्रदेश 10 टक्के
राजस्थान 7 टक्के
विविध देशांतून येणारे पर्यटक
अमेरिका 16%
ब्रिटन 11.9 %
बांगलादेश 7 %
श्रीलंका 4.5 %
कॅनडा 3.8 %


जीडीपीत 6.6% वाटा
देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) पर्यटन उद्योगाचा वाटा जवळपास 6.6 टक्के असून या क्षेत्रात मनुष्यबळाचे प्रमाण जवळपास 7.7 टक्के आहे. त्यामुळे देशातील पर्यटन उद्योगाला गती देण्याच्या दृष्टीनेदेखील सरकार आणखी प्रयत्न करणार असल्याचे असोचेमचे महासचिव डी. एस. रावत यांनी सांगितले.