आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- इलेक्ट्रॉनिक वस्तूंची ऑनलाईन विक्री वाढत असली तरी त्यामुळे त्या-त्या राज्यांचा महसूल बुडत असून महाराष्ट्रातही तोच अनुभव येतो आहे. त्यामुळे सरकारने याबाबत उपाय करावेत अशी मागणी कॉम्प्युटर्स अँड मिडिया डिलर असोसिएशनने (सीएमडीए) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून केली असल्याची माहिती संघटनेने दिली आहे. जकातीला पर्याय म्हणून स्थानिक संस्था कर (एलबीटी) आल्यानंतर केवळ पुणे विभागातील संगणक विक्रेत्त्यांकडून मिळणारा महसूल 100 कोटी रुपये झाला आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
इलेक्ट्रनिक वस्तूंची ऑनलाईन विक्री कराच्या जाळ्यात सध्या येत नाही, असे नमूद करून निमंत्रक अनिरुध्द मेणवलीकर म्हणाले, की ऑनलाईन खरेदी करणे स्वस्त पडत असले तरी ग्राहकाचा विचार करता त्याला वस्तूची हमी दिली जात नाही. तसेच त्यात काही दोष असल्यास विक्रीपश्चात सेवा मिळत नाही. केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व नियम पळून आम्ही व्यवसाय करतो. तर ऑनलाईन विक्रेते सरकारला कर भारत नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. एक प्रकारे आम्हाला त्यापासून धोका आहे. ऑनलाईन विक्रीबाबत राज्य आणि केंद्र दोन्ही पातळीवर निश्चित धोरण नसणे हे त्यामागचे कारण आहे.
महाराष्ट्रात स्थानिक संस्था कर रचना सर्वाधिक त्रासदायक असून केंद्राकडे संस्थेने गाऱ्हाणे मांडले आहे. बदलत्या राजकीय स्थितीत एलबीटीबाबत काहीतरी तोडगा काँग्रेस नेत्यांना काढावा लागेल अशी अपेक्षा आहे, कारण तो व्यवसाय वाढीत अडथळा ठरतो आहे.
सध्या स्मार्टफोन विक्री वेगाने वाढत असून टॅब्लेटचा खप घटतो आहे असे नमूद करून ते म्हणाले, की आमच्या 350 सदस्यांची सर्व उत्पादने आणि सेवांची एकत्रित उलाढाल अडीच हजार कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सीसीटीव्ही मागणीत 25-30 टक्के वाढ झाली आहे. त्यात पुणे महापालिका आणि राज्य सरकारकडून येणारी मागणी मोठी आहे.
सीएमडीएला यंदा वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. यंदाही शिवाजीनगर येथील साखर संकुलात 12-15 डिसेंबर या काळात 16 वे आय टी एक्स्पो आयोजित करण्यात आले आहे. त्याची माहिती देण्यास आयोजित पत्रकार परिषदेत निमंत्रक अनिरुध्द मेणवलीकर म्हणाले, की समाज माध्यमे, सायबर सुरक्षा यासह अनेक विषयांचा उहापोह करणारी चर्चा सत्रे हे यंदाचे वैशिष्ट्य असेल. तसेच गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही आम्ही ई वेस्ट जमा करणार आहोत. एकूण 125 वेगवेगळ्या कंपन्या यात सहभागी होत आहेत. संस्थेने केके मार्केट भागात नवे स्वतंत्र कार्यालय घेतले असून तिथे कन्व्हेन्शन आणि प्रशिक्षण केंद्र सुरु केले जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.