आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra To Do Away With Octroi Completely By Year end

डिसेंबरअखेरपर्यंत जकात पूर्णपणे रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये क्रमाक्रमाने स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यात येत असल्यामुळे यंदाच्या डिसेंबर महिन्यापर्यंत जकातीचे पूर्णपणे उच्चाटन होण्याचा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

जकात शुल्काची आकारणी करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे; परंतु जकातीऐवजी अलीकडेच स्थानिक संस्था कर लागू करण्यात आला आहे. सध्या लातूर, नाशिक, परभणी, अहमदनगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण - डोंबिवली यासह काही महागनरपालिका क्षेत्रांमध्ये एलबीटीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. एखाद्या व्यापा-याने जर शहरात व्यापार करण्यासाठी वस्तू आणल्यास प्रत्येक व्यापा-याला त्या वस्तूचा स्थानिक संस्था कर (एलबीटी) भरावा लागतो.

लहान महानगरपालिकांपासून प्रारंभी सुरुवात करून टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी होईल. लवकरच पुणे, नागपूर, पिंपरी - चिंचवड आणि मुंबई पालिकेमध्ये एलबीटी लागू करण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले.

मुंबईत आता एलबीटी - मुंबई महानगरपालिकेने जुना जकात कर रद्द करून त्याऐवजी 1 ऑक्टोबरपासून स्थानिक संस्था कर लागू करण्याची घोषणा केली आहे. शहरात येणा-या मालावर जकात शुल्क आतापर्यंत आकारण्यात येत होते; परंतु स्थानिक संस्था कर हा त्या मालाच्या मूल्यावर एकरकमी आकारला जातो. विशेष म्हणजे जकात शुल्क हे रोख स्वरूपात दैनंदिन आधारावर गोळा केले जाते; परंतु स्थानिक संस्था कर हा शहरात माल आल्यानंतर 40 दिवसांच्या कालावधीत द्यावा लागतो.