महिंद्राचा ‘बोलेरो / महिंद्राचा ‘बोलेरो मॅक्सी ट्रक प्लस’ ट्रक बाजारात दाखल

प्रतिनिधी

May 08,2013 12:00:00 AM IST

मुंबई - शहरातील वाढत्या वाहतुकीला उत्तर देण्यासाठी व्यावसायिक वाहनांच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या महिंद्रा आणि महिंद्राने ‘बोलेरो मॅक्सी ट्रक प्लस’ हा नवीन छोटेखानी ट्रक बाजारात दाखल केला आहे. वाहतूक कोंडी, शहरातील निमुळत्या गल्ल्या, उड्डाणपूल यांची पर्वा न करता सर्वोत्तम इंधन क्षमता असलेला हा छोटेखानी ट्रक अशोक लेलॅँडच्या ‘दोस्त’ या लहान ट्रकला टक्कर देणारा आहे. एक ग्राहक केंद्रित कंपनी या नात्यातून महिंद्राने माल वाहून नेण्याची सर्वाधिक क्षमता आणि सुधारित सुरक्षा योजनेवर जास्त भर दिला आहे.


आजच्या शहरीकरणातील मालवाहतुकीच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन या मिनी ट्रकची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आपल्यात सुधारणा करून आणखी जास्त कमाई करण्याची इच्छा असलेल्या विद्यमान ग्राहकांच्या गरजादेखील हा ट्रक भागवू शकतो, असे कंपनीच्या ऑटोमोटिव्ह विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण शहा यांनी या छोट्या ट्रकच्या अनावरणप्रसंगी बोलताना सांगितले. छोटेखानी ट्रक अर्थात पिकअप वाहनांच्या बाजारपेठेत झपाट्याने वाढ होत असून दोन ते साडेतीन टनक्षमता असलेल्या हलक्या व्यावसायिक वाहनांच्या गटात कंपनीने 2012 - 13 आर्थिक वर्षात 54 टक्के बाजारहिस्सा मिळवून अव्वल स्थान पटकावले असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.


बोलेरो मॅक्स ट्रक प्लसची वैशिष्ट्ये
> प्रतिलिटर 17.7 किलोमीटर सर्वाधिक इंधन क्षमता
> अंतर्गत तसेच बाह्य सजावट स्टायलिश
> अत्यंत आरामदायक चालक केबिन
> चालकाबरोबर आणखी एका व्यक्तीला आरामात बसण्याची सुविधा
भार घेण्याची क्षमता : 1.15 टन
डिजिटल इम्मोबिलायझर सुविधा


एक लाख पिकअप वाहन विक्रीचा टप्पा पार
महिंद्राने 2012-13 या वर्षात एक लाखापेक्षा जास्त पिकअप वाहनांची विक्री केली आहे. कंपनीच्या स्थापनेपासूनची ही सर्वात चांगली कामगिरी आहे. कंपनीच्या विक्रीमध्ये लक्षणीय 41 टक्क्यांनी वाढ होऊन ती गेल्या आर्थिक वर्षात 1,02,885 वाहनांवर गेली आहे. त्या अगोदरच्या वर्षात कंपनीने 73 हजार 134 वाहनांची विक्री केली होती.

X