आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mahesh Joshi Article About Aurangabad Jaggery Businessman

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोघा मित्रांची वेगळी वाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्लेव्हरमधील गुळाची कल्पना केली आहे का? औरंगाबादेतील दोन कल्पक मित्रांनी हे करून दाखवले आहे. त्यांनी स्ट्रॉबेरी, चॉकलेट, अननस, आंबा आदी फ्लेव्हरमधील गुळाचे उत्पादन सुरू केले आहे. पारंपरिक गुऱ्हाळांना संघटित रूप देत सहकार महर्षी बाळासाहेब पवार अ‍ॅग्रो बेस्ड इंडस्ट्रीचे इनोव्हेशन या कंपनीची स्थापना केली आहे. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या उसाला चांगला भाव तर आलाच शिवाय गुळापासून दूर जाणारा तरुण वर्गालाही याकडे आकर्षित केले आहे. गाव-खेड्याच्या सीमा ओलांडत फ्लेव्हर्ड गुळ सातासमुद्रापार पोहोचला आहे.

बंद कारखान्यामुळे पडलेला ऊस विकत घेऊन शेतकरी जगवला : अभिजित देशमुख आणि कॅप्टन प्रशांत माने या मित्रांनी एक पाऊल पुढे टाकत औरंगाबादेत फ्लेव्हर्ड गुळाची निर्मिती करणारा देशातील कारखाना सुरू केला आहे. गंगापूर, फुलंब्री आणि कन्नड येथील साखर कारखाने बंद असल्याने शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली होती. देशमुख आणि माने यांनी हीच समस्या ओळखली साखर कारखाना टाकणे किंवा बंद कारखाना सुरू करणे हे कठीण आणि वेळखाऊ काम होते. यातूनच मग फ्लेव्हर्ड गुळाची कल्पना सुचली. आईस्क्रीमला जसे वेगवेगळे फ्लेव्हर्स असतात त्याप्रमाणे गुळाला चव दिली तर? ही कल्पना मनात सुचली आणि दोघेही कामाला लागले. कृषितज्ञ, अन्नप्रक्रिया उद्योगातील तज्ज्ञ, इंटरनेट, पुस्तके अशा सर्वच माध्यमातून माहिती गोळा केली. सहा महिने संशोधन केल्यावर ब्लू प्रिंट तयार झाली. लगेच सहकार महर्षी बाळासाहेब पवार अ‍ॅग्रो बेस्ड इंडस्ट्रीची स्थापना केली. तर नोव्हेंबर २००९ मध्ये वाळूज एमआयडीसीजवळील वळदगाव येथील शेतात साडेतीन एकर जागेवर ९० लाख रुपयांच्या गुंतवणुकीत कंपनी सुरू केली.
असा आहे प्रकल्प.

दररोज ८० ते १०० टन उसावर प्रक्रिया : या प्रकल्पात उसाची कटाई, रस काढणे हे मशिनीद्वारे केले जाते. मोठाल्या कढईत तो तापवला जातो. त्यात फ्लेव्हर पावडर टाकून ते तीन तास उकळले जाते. रस थाेडा घट्ट झाल्यावर तो लोखंडी ट्रेमध्ये ओतला जातो. लगेच त्यापासून गुळाच्या भेल्या तयार केल्या जातात. दररोज ८० ते १०० टन उसावर प्रक्रिया करण्याची या गुऱ्हाळाची क्षमता आहे. वर्षातून सहा ते सात महिनेच हे काम चालते. गंगापूर, पाटोदा, जिगठान, पंढरपूर, वाळूज अशा ३५ ते ४० गावांतील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना या कंपनीचा फायदा झाला आहे.

येथे कारखान्यांपेक्षा थोडा अधिक भाव मिळतो. कारखान्यात ऊस पोहोचण्यासाठी २ ते ३ दिवस वाट बघावी लागते. यामुळे उसाचे वजन घटते. परंतु येथे गरजेप्रमाणेच ऊस मागवल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान टळते. लगेच पैसे दिले जातात. या उद्योगाची सुरूवात त्यांन स्ट्रॉबेरी फ्लेव्हरपासून केली. महाबळेश्वरहून स्ट्रॉबेरी मागवली. यास चांगला प्रतिसाद मिळाला.

उच्चशिक्षीत पार्टनर
पवार अ‍ॅग्रो बेस्ड इंडस्ट्रीचे कर्तेधर्ते अभिजीत देशमुख आणि कॅप्टन प्रशांत माने दोघेही उच्चशिक्षीत आहेत. प्रशांत माने हे लायसन्ड कर्मशियल पायलट आहेत. २००४ मध्ये त्यांनी दिल्ली फ्लाईंग अ‍ॅकडमीमध्ये ग्राऊंड ट्रेनिंगचा कोर्स पूर्ण केला. पुढे टेक्सॉस येथे यूएस फ्लाईट अ‍ॅकडमीमध्ये कर्मशिअल पायलटचे प्रशिक्षण घेतले.

लंडनमध्येही गुळाची चव
पुणे, वाशी, जळगाव, देशभरातील मॉल आणि सुपर मार्केटमध्ये हा गुळ उपलब्ध आहे. दुबईतूनही या गुळाला मागणी आहे. तर दोन वर्षापासून अमेरिका आणि इंग्लंडमध्ये गुळाची निर्यात होत आहे. घरगूती वापरासह हॉटेल, ढाबे, केटरर्स येथे गूळ लागतो. साधारण गुळ ३५ ते ५० रूपये किलो आहे.

गुणवत्तेवर कटाक्ष
लहानपणापासूनच मला स्वत:चा उद्योग करायचा होता. अ‍ॅव्हीऐशनची आवड असल्यामुळे काही काळ या क्षेत्रात काम केले. पण गावाची ओढ लागल्यामुळे च फ्लेव्हर्ड गुळाचा उद्योग सुरू करता आला. अशा प्रकारचा हा एकमेव प्रकल्प असून गुणवत्ता आणि चवीच्या बाबतीत तडजोड न केल्यामुळे आमच्या गुळाला सर्वत्र जोरदार मागणी आहे. - अभिजीत देशमुख, संचालक

आरोग्यासाठी गुळ
भारतीय परंपरेत गुळाला अनन्यसाधारण महत्व आहे. गुळ आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. पण आजची पिढी गुळाला विसरत चालली आहे. आमचे फ्लेव्हर्ड गुळ त्यांना पुन्हा एकदा याकडे आकर्षीत करेल, असा आम्हाला विश्वास वाटतो.
- कॅ.प्रशांत माने, संचालक