आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

REVA E2O: महिंद्राने लॉंच केली 'चार्जिंग' कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- सेलफोन वापरून नियंत्रण करता येणारी आणि फ्रीज, टीव्ही चालू करण्यास वापरली जाणारी वीज जोडणी वापरून चार्ज करता येणारी गिअररहित रेवा ईटुओ कार महिंद्रा कंपनीने आज महाराष्ट्राच्या बाजारपेठेत सादर केली. कारची किमत सुमारे सात लाख रूपये इतकी आहे.

कंपनीच्या भावी योजनांची माहिती देताना मुख्यकार्यकारी अधिकारी आर. चंद्रमौळी म्हणाले की, सध्या वर्षाला सहा हजार कार आम्ही उत्पादन करणार आहोत. पुण्याच्या महत्वाच्या भागात चार्जिंग सुविधा विकसित केली जाणार आहे. सध्या महिंद्र वितरकांकडे ही सोय आहे. हिंजवडी आणि मगरपट्टा येथे जशी सोय आहे तशी वेगवेगळ्या मॉल, पार्किंग या ठिकाणी केली जाणार आहे. १५ अम्पिअर पॉवर सॉकेट वापरून कार पाच तासात चार्ज होते.

महिन्याला हजार किलोमीटर अंतरासाठी सहाशे रुपये खर्च येतो आणि आम्ही ग्राहकाला त्याच्या घरी विक्री पश्चात सेवा देणार आहोत. ज्यांच्याकडे आधीची रेवा आहे त्यांना वरची रक्कम भरून कार बदलून दिली जाईल अशी माहिती देऊन ते म्हणाले की, सौर उर्जेवरही कार चार्ज करता येते. त्यासाठी सौर तावदाने आम्ही एक लाख रुपयात उपलब्ध करून देणार आहोत. जसे पेट्रोल कारला रिझर्व्ह साठा असतो त्याच धर्तीवर ८-९ किलोमीटर अंतर जाईल अशी रिझर्व्ह बॅटरी यात आहे आणि ती सेल फोनने वापरता येते. क्लच आणि गिअर नसल्याने शहरात चालविण्यास ही सोपी आहे. कंपनीने एक लाख ऐंशी हजार किलोमीटर इतकी चाचणी घेतली आहे. स्थानिक संस्था कर किती आकारला जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने त्‍याची अधिक रक्कम ग्राहकांना द्यावी लागेल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.