नवी दिल्ली - महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने
आपल्या सर्व वाहनांच्या किमती एक टक्क्यापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिंद्राच्या प्रवासी तसेच व्यावसायिक वाहनांच्या किमती मॉडेलनुसार २३०० ते ११,५०० रुपयांनी (एक्स-शोरूम) वाढल्या आहेत. वाहन उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे सर्व वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे महिंद्रा अँड महिंद्राने सांगितले. नव्या किमती नोव्हेंबर २०१४ पासून लागू होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.
या किंमतवाढीबाबत महिंद्रा अँड महिंद्राचे मुख्य कार्यकारी (ऑटोमोटिव्ह) प्रवीण शहा यांनी सांगितले, वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय कंपनीने राखून ठेवला होता. मात्र, उत्पादन खर्चासाठी लागणा-या साहित्याच्या महागाईने किंमतवाढ करणे अत्यंत आवश्यक ठरले. महिंद्राच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरनेही सर्व ट्रॅक्टरच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे मॉडेलनिहाय ट्रॅक्टरच्या किमती ६००० ते १०००० रुपयांनी वाढल्या आहेत.
विक्रीची गाडीही घसरली
दसरा-दिवाळी आदी सण म्हणजे वाहन विक्रीची सुगी समजली जाते. यंदाच्या ऑक्टोबरमध्ये ऐन सुगीत ग्राहकराजाने पाठ फिरवल्याने कार विक्रीची गाडी घसरणीच्या घाटातच अडकली. ऑक्टोबरमध्ये कारच्या विक्रीत २.५५ टक्के घट आली आहे. सलग दुस-या महिन्यात विक्रीत झालेल्या घसरणीमुळे कार कंपन्यांसमोर बिकट मार्ग असल्याचे मानले जाते आहे. सोसायटी आॅफ इंडियन ऑटो
मोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) जारी केलेल्या आकडेवारीनुसार यंदाच्या ऑक्टोबरमध्ये देशातील कारची िवक्री १,५९,०३६ राहिली. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये १,६३,१९९ कारची विक्री झाली होती.
या गाड्या महागल्या
महिंद्रा अँड महिंद्राच्या ताफ्यात प्रामुख्याने स्पोर्ट््स युटिलिटी व्हेइकल्स (एसयूव्ही) आहेत. त्यामुळे स्कॉर्पिओ, बोलेरो आणि एक्सयूव्ही ५०० या गाड्यांसाठी आता जास्त दाम मोजावे लागणार आहेत. कंपनीच्या अल्फा आणि जिओ या व्यावसायिक वाहनांसाठीही जास्त किंमत द्यावी लागणार आहे, तर अर्जुन व युवराज हे ट्रॅक्टरही महागले आहेत.
टाटाची व्यावसायिक वाहने महागली :
महिंद्रापाठोपाठ टाटा मोटर्सनेही त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. टाटाच्या प्रवक्त्याने सांगितले, कंपनीने ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात व्यावसायिक वाहनांच्या किमती १ ते २ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. टाटाच्या ताफ्यातील हलकी व्यावसायिक वाहने, बस आणि ट्रकसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
प्रवासी वाहने
टाटाने प्रवासी वाहनांच्या किंमतवाढीबाबत अद्याप निर्णय जाहीर केलेला नाही. कंपनीच्या ताफ्यात एंट्री लेव्हलच्या नॅनो या हॅचबॅकपासून ते मल्टी युटिलिटी अरिआ अशी प्रवासी वाहनांची श्रेणी आहे.
ऑक्टोबरमधील कंपनीची कामगिरी
कंपनी |
विक्री
(ऑक्टो. २०१४)
|
विक्री
(ऑक्टो. २०१३)
|
घट |
टाटा मोटर्स |
९,५९४ |
१०,९४४ |
१२.३३ |
महिंद्रा |
१९,०२९ |
२२,०३५ |
१३.६४ |