आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रमुख पिकांचे उत्पादन घटणार : सीएमआयई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - यंदाच्या वर्षी झालेल्या अनियमित पावसामुळे कडधान्ये आणि तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी चालू वर्षात देशातील प्रमुख पिकांचे (खाद्य आणि खाद्येतर) उत्पादन 2.8 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने आपल्या मासिक अहवालात व्यक्त केला आहे.
सीएमआयईच्या अहवालानुसार खाद्येतर पिकांचे उत्पादन 2.7 टक्क्यांनी तर अन्नधान्याचे उत्पादन 2.9 टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. परिणामी प्रमुख पिकांचे उत्पादन 2012-13 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.

नुकत्याच संपलेल्या खरीप हंगामामध्ये यंदा पडलेल्या अनियमित पावसाचा धान्य तसेच धान्येतर पिकांच्या लागवडीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्याचबरोबर तांदूळ, कडधान्ये आणि डाळींचे उत्पादन कमी झाल्यामुळे अन्नधान्य उत्पादन कमी होण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. सध्या सुरू असलेल्या रब्बी हंगामामध्ये पेरण्यांनी वेग घेतला असून अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत पेरण्यांचे प्रमाण 1.2 टक्क्यांनी जास्त असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

तांदळाला मोठा फटका
चार जानेवारीपर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार गव्हाच्या लागवडीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.6 टक्क्यांनी वाढ होऊन ती 286.4 लाख हेक्टरवर गेली आहे. केंद्र सरकारने आधारभूत किमतीत प्रतिक्विंटल 65 रुपयांवरून 1,350 रुपयांपर्यंत वाढ केल्यामुळे गहू लागवडीखालील प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे चालू वर्षात तांदळाच्या उत्पादनातदेखील 3.4 टक्क्यांनी घट येण्याचा अंदाज आहे.

खरीप आणि रब्बी हंगामातील पेरण्यांची कामे मंद गतीने झाल्यामुळे तांदळाचे उत्पादन घटण्यास मुख्य कारण ठरणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. देशातील तांदळाच्या एकूण उत्पादनात खरीप उत्पादनाचा वाटा जवळपास 80 टक्के आहे. सध्या सुरू असलेल्या रब्बी हंगामामध्ये तांदूळ लागवडीखालील क्षेत्रफळ जवळपास 4 टक्क्यांनी घटले आहे. 4 जानेवारी 2013 पर्यंत तांदूळ लागवडीखालील क्षेत्रफळ 25.7 टक्क्यांनी घसरून ते 4.5 लाख हेक्टरवर आले आहे.