आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malvan Mangoes Website Launching News In Marathi

हापूस आंबा आता एका क्लिकवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रसाळ आणि सुमधुर चवीचा हापूस म्हणजे अनेकांचा वीक पॉइंट. मात्र, महागडा हापूस विकत घेणे ही कला सगळ्यांनाच अवगत असेल असे नाही. मात्र, जगप्रसिद्ध असलेला मालवणचा हापूस आंबा आता घरपोच मिळणार आहे. सामान्यांनाही परवडेल असा गुणवत्तापूर्ण, केमिकलरहित आणि योग्य दरात असलेला मालवणचा आंबा आता ऑनलाइन ऑर्डर करता येणार आहे.

दादरच्या यशवंतराव नाट्यगृहात झालेल्याल बॉर्न टू विनच्या ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती कार्यक्रमात मराठी व्यापारी मित्रमंडळाचे अध्यक्ष अनंत भालेकर यांच्या हस्ते ‘मालवण मँगोज’ संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी आणि मालवण मँगोजचे संस्थापक अमित आचरेकर उपस्थित होते.

नुसतीच विक्री हा या संकेतस्थळाचा उद्देश नसून या उपक्रमाद्वारे कोकणातील शेतकर्‍यांचा आंबा शहरात आणून त्यांना त्यांच्या फळांचा आणि वर्षभराच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल यासाठी हे संकेतस्थळ बांधील राहील, असे ‘मालवण मँगोज’चे संस्थापक अमित आचरेकर या वेळी म्हणाले. आंब्याच्या बागा दलालांमार्फत खरेदी केल्या जातात आणि अस्सल हापूस आंबा बाहेर देशांत पोहोचवला जातो. बागा भाडेतत्त्वावर खरेदी केल्या जातात आणि त्यांची किंमत शेतकर्‍याला दिली जाते; पण ही किंमत समाधानकारक नसते. शेतकर्‍याने जर लागवड केलेले आंबे स्वत:च विकले तर त्याला मिळणारी किंमत याहून किती तरी जास्त असू शकते याकडे आचरेकर यांनी लक्ष वेधले.

कोकणातील अस्सल हापूस आंबा हा निर्यात केला जात असल्यामुळे तो मुंबई शहरात फारच कमी प्रमाणात आणि महागड्या दरात येतो. यात मुख्यत्वे आंबा दलालांचे फावते. उन्हाळ्यात आंब्याला मागणी फार असल्याने बाजारपेठेत केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेशचे आंबे हे रत्नागिरी आणि देवगडचे म्हणून विकले जातात, असे मालवण मँगोजचे संस्थापक अमित आचरेकर म्हणाले.

महिला बचत गटातर्फे विक्री
मालवण मँगोजने सहकारी तत्त्वावर महिला बचत गटाच्या महिलांच्या मदतीने शेतकर्‍यांकडील आंबा शहरात आणून विक्री करण्याची योजना आहे. यामुळे शेतकर्‍याला त्यांच्या फळांचा योग्य मोबदला आणि शहरातील ग्राहकांना कोकणातील अस्सल आंबा सुयोग्य किमतीत चाखायला मिळणार आहे. आंबे विकत घेतल्यानंतर खर्च केलेल्या पैशातला हिस्सा शेतकरी आणि महिलांनासुद्धा मिळणार आहे. सहकारी तत्त्वावर महिला बचत गटांद्वारेही योजनी राबण्याची तयारी जोरात सुरू आहे.