आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याधुनिक तंत्रज्ञानातून साधणार आंबा उत्पादनाची ‘उन्नती’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आंबा आणि त्यापासून होणार्‍या विविध उत्पादनांना बळकटी देण्याच्या दृष्टीने बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आघाडीवर असलेल्या हिंदुस्तान कोका-कोला बिव्हरेजेस प्रा.लि. या कंपनीने आपल्या ‘प्रोजेक्ट उन्नती’ या उपक्रमामध्ये पुढील दहा वर्षांमध्ये 50 कोटी रुपयांची गुंतवणूक करून तो विस्तारण्याची योजना आखली आहे.
जैन इरिगेशन या कंपनीच्या सहकार्याने राबवण्यात येणार्‍या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात यश मिळाल्यानंतर तो आणखी पाच पटींनी विस्तारण्यात येणार आहे. दुसर्‍या टप्प्यात 25 हजार शेतकर्‍यांपर्यंत पोहोचून पुढील दहा वर्षांत 50 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असल्याचे हिंदुस्तान कोका कोलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टी. कृष्णकुमार आणि जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी उभय कंपन्यांमध्ये परस्पर सामंजस्य करारही करण्यात आला.
हा प्रकल्प विस्तारल्याने शेतकर्‍यांना भरपूर उत्पादन आणि उत्पन्न मिळून वितरण व्यवस्था बळकट होऊ शकेल. त्याचप्रमाणे ‘माझा’ आणि ‘मिनिट मेड मँगो’ या ब्रॅँडचे उत्पादन वाढवण्यास मदत होईल, असे टी. कृष्णकुमार यांनी सांगितले. जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन म्हणाले की, अल्ट्रा हाय डेन्सिटी हे अतिशय खात्रीशीर तंत्रज्ञान असून पारंपरिक पद्धतीपेक्षा 200 टक्के अधिक उत्पादन काढण्याची क्षमता यात आहे. दुसर्‍या टप्प्यात प्रकल्पांतर्गत 25,000 शेतकर्‍यांची निवड केली जाईल, जे 50,000 एकर जागेवर शेती करत आहेत आणि त्यांना अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लांटेशन तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहित केले जाईल.
अल्ट्रा हाय डेन्सिटी लागवड म्हणजे काय
अल्ट्रा हाय डेन्सिटी लागवड (यूएचडीपी) तंत्रज्ञानामुळे एका एकरमध्ये जवळपास 600 झाडे लावता येतात. पारंपरिक पद्धतीने मात्र एका एकरमध्ये चाळीस झाडे लावता येतात. त्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पादन वाढते. ठिबक सिंचन, प्रत्यक्ष बाग/शेतीत येऊन प्रशिक्षण आणि बागेसाठी मदत यांचा यूएचडीपी तंत्रज्ञानात समावेश होतो. हे तंत्रज्ञान आतापर्यंत अनेक शेतकर्‍यांनी यशस्वीपणे अवलंबल्यानंतर पहिले पीक यावर्षी आले. पारंपरिक आंबा उत्पादन पद्धतीत झाडांच्या वाढीवर मर्यादा घातली जात नाही. ती जितकी वाढतील तितकी वाढू दिली जातात. फार क्वचित ती छाटली जातात किंवा छाटलीच जात नाहीत. यूएचडीपीमध्ये झाडाचा पर्णसंभार अशा पद्धतीने राखला जातो की लागवडीच्या पहिल्या काही वर्षांत जास्तीत जास्त सूर्यप्रकाश झाडाला मिळेल. यामुळे कमाल उत्पादन मिळते.
पहिला प्रयोग तामिळनाडूमध्ये
० हे अभिनव तंत्रज्ञान जैन इरिगेशनने आपल्या तामिळनाडू इथल्या उदमालपेठ इथल्या प्रयोग आणि संशोधन शेतामध्ये एकात्मता आणून ते व्यावसायिक पातळीवर राबवले. येथे यूएचडीपीअंतर्गत 100 एकर जागेत लागवड करण्यात आली आहे.
० यूएचडीपी तंत्रज्ञान अवलंबल्याने 50,000 एकरहून अधिक जागेत शेती करणार्‍या 25,000 शेतकर्‍यांना होणार फायदा
० 2022-23 पर्यंत 3,00,000 आंब्यांच्या उत्पादनाचा टप्पा गाठणार
० अल्ट्रा हाय डेन्सिटी लागवडीमुळे आंबा उत्पादनात सरासरी दुपटीपेक्षाही जास्त वाढ