कोकणातील आंबा उत्पादन / कोकणातील आंबा उत्पादन घटणार

Apr 27,2013 12:00:00 AM IST

ठाणे - अवकाळी पाऊस आणि बदलते हवामान याचा जबरदस्त फटका कोकणातील आंबा उत्पादनाला बसला असल्याचे निरीक्षण दोन संस्थांनी नोंदवले आहे. कोकणातील आंबा उत्पादन 2011 आणि 2010 च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटणार असल्याचे या संस्थांच्या अहवालात म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांपासून कोकणातील अल्फान्सोसह (हापूस) विविध वाणाच्या आंब्याचे उत्पादन सातत्याने घटत असल्याचे या संस्थांनी म्हटले आहे.


कोकण विकास परिषद आणि संस्कार या दोन संस्थांनी कोकणातील आंबा उत्पादनाचा अभ्यास केला. त्याअंती त्यांनी हे निरीक्षण नोंदवले. कोकणात 2010 मध्ये 3.20 लाख मेट्रिक टन आंबा उत्पादन झाले. 2011 मध्ये ते घटून 2.56 मेट्रिक टनांवर आले, तर 2012 मध्ये ते 1.23 मेट्रिक टनांवर आले. यंदा आंबा उत्पादन 1.28 मेट्रिक टन होण्याची शक्यता असल्याचे या संस्थांनी म्हटले आहे. कोकण विकास परिषद आणि संस्कारतर्फे ठाण्यासह मुंबईतील विविध भागांत आंबा महोत्सवाचे आयोजन गेल्या आठ वर्षांपासून केले जाते.


ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम
कोकणात 1,80,000 हेक्टर्स इतके क्षेत्र आंब्याखाली आहे. येथील हापूस आंब्याची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली आहे. अनियमित व अवेळी पडणारा पाऊस आणि तापमानातील चढ-उतार याचा अनिष्ट परिणाम गेल्या तीन वर्षांपासून आंबा उत्पादनावर झाला असल्याचे या संस्थांनी म्हटले आहे.

X