आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पबचत ठेवींसाठी डेट फंडांचे निवडक उत्तम पर्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुंतवणुकीचे साधन निवडताना संभाव्य जोखीम, अपेक्षित परतावा आणि करदायित्व या महत्त्वाच्या चाचण्या असतात. एकदा काय करायचे आहे हे पक्के ठरवल्यानंतर गुंतवणुकीसाठी उपयुक्त साधन शोधणे सुलभ ठरते. जेव्हा लक्ष्य लहान असेल आणि फारशा जोखमीची तयारी नसेल अशा वेळी कमी चढ-उतारांचा पर्याय उत्तम ठरतो. यामुळेच बहुतेक लोक बँक ठेवी किंवा अल्पबचत योजनांत गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असतात.
बँकेत पैसे ठेवणे आपण सुरक्षित मानतो. मात्र कराचा मुद्दा लक्षात घेतल्यास बँक ठेवी फारशा फायदेशीर नसतात. सर्व प्रकारच्या मुदत ठेवींसाठी ही बाब लागू आहे. पीपीएफ आणि करमुक्त रोखे वगळता सर्व प्रकारच्या मुदत बंद ठेवी करयुक्त परतावा देतात. जर डेट म्युच्युअल फंडांत अभ्यासपूर्ण निवड करून गुंतवणूक केल्यास , सुरक्षित मानल्या जाणा-या इतर साधनांपेक्षा हा पर्याय उत्तम ठरतो. याचा तुलनात्मक अभ्यास केल्यास त्याचे फायदे समजून घेता येतील...
1. लिक्विड/ अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड विरुद्ध बचत खाते : या स्वरूपाच्या फंडात कमी कालावधीत मॅच्युअर होणा-या सेक्युरिटीज विशेषत: मनी मार्केट साधनांत गुंतवणूक करतात. या गुंतवणुकीची तुलना बचत खात्यातील जमा रकमेशी करता येईल. यात बँक आणि म्युच्युअल फंड दोघेही ट्रेजरी मार्केटमधून परतावा मिळवत असतात. त्यांचा परतावाही जवळपास सारखाच असतो. मात्र खातेदारांपर्यंत येईपर्यंत त्यात बदल होतो. काही बचत खात्यांवर 6 ते 7 टक्के तर काही खात्यांवर चार टक्के व्याज मिळते. ज्या खातेदारांना बँक खात्यावर कमी व्याज मिळते आहे त्यांना खाते बदलण्याची गरज नाही. ते आपले पैसे लिक्विड फँडात गुंतवू शकतात. चालू खातेधारकांना त्यांच्या खात्यातील रकमेवर व्याज मिळत नाही, त्यांनी अशा फंडांत गुतवणूक करावी.
2.फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन विरुद्ध बँकेच्या मुदत ठेवी : एफएमपीची तुलना बँक एफडीशी करता येते. जेव्हा निश्चित कालावधीसाठी पैसे गुंतवायचे असून चांगला परतावाही मिळवायचा असेल तेव्हा एफएमपीची निवड करावी. ही दोन्ही साधने सारखाच परतावा देतात. मात्र करकपातीचा फरक पडतो. बँक मुदत ठेवींवर मिळणारे व्याज पूर्णपणे करपात्र असते. मात्र म्युच्युअल फंडाच्या एफएमपीमध्ये एक वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक केल्यास त्यावर 10 टक्के किंवा इंडेक्स गेनवर 20 टक्के (दोन्हीपैकी जे कमी असेल ते) कर द्यावा लागतो. कराचे दायित्व इंडेक्सेशनवर अवलंबून असल्यामुळे बहुतेक वेळा मिळणारा परतावा करमुक्त असतो.
3. लाँग टर्म फंड विरुद्ध पीपीएफ : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीचे (पीपीएफ) व्याजदर
बाजाराशी जोडण्यात आले आहेत. त्यामुळे गुंतवणूक पोर्ट फोलिओचे सक्रिय व्यवस्थापन आणि पीपीएफ व लाँग टर्म उत्पादने यांच्यांत ताळमेळ घालणे आवश्यक ठरते. ज्या ज्या वेळी व्याजदर घटतील त्या त्या वेळी पीपीएफवरील व्याजदरात घट होईल. मात्र, लाँग टर्म डेटमधील गुंतवणुकीतून जास्त परतावा
मिळू शकतो, कारण व्याजदर घटल्यास रोख्यांच्या किमतीत वाढ होते. इंडेक्सेशनचा फायदा घेतल्यास
करसुद्धा कमी लागतो.
4. म्युच्युअल फंड एमआयपी विरुद्ध सीनियर सिटीझन प्लॅन/ पोस्ट ऑफिस -एमआयएस : आपला नियमित करपात्र परतावा म्युच्युअल फंडांच्या एमआयएसमध्ये वैविध्यकरण करून करामध्ये मोठ्या प्रमाणात बचत साधता येते. ब-याच वेळा एमआयपी सिस्टिमॅटिक विड्राल योजनांनी पोस्ट ऑफिस-एमआयएसपेक्षा जास्त टॅक्स एफिशियंट परतावा दिला आहे.
लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.