आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manufacturing Production Come Down, Export Also Decline

उत्पादन घटल्याने उद्योग क्षेत्राचे चक्र अद्याप मंद, निर्यातीत घट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - औद्योगिक उत्पादन घटल्याने उद्योग क्षेत्राचे चक्र अद्याप मंद असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी निर्यात घटली. भाजीपाला कडाडल्याने महागाईचा दर 9.8 टक्क्यांवर पोहोचला. जूनमधील या क्षेत्रातील आकडेवारी सरकारने शुक्रवारी जाहीर केली. सर्वच पातळीवर निराशा करणारी आकडेवारी असल्याने मंदीचे ढग दाटत असल्याचे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले.


महागाईचा भडका
भाजीपाला कडाडल्याने किरकोळ महागाईचा वेलू गगनाकडे निघाल्याचे चित्र आहे. जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर 9.87 टक्के झाला. मेमध्ये हा दर 9.31 टक्के होता. अन्नधान्याच्या किमती वधारल्याचा परिणाम महागाई निर्देशांकावर झाला. मागील तीन महिन्यांतील घसरणीनंतर जूनमध्ये महागाई दरात वाढ दिसून आली. यामुळे रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करण्याच्या आशेवर पाणी पडणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जूनमध्ये भाजीपाला 14.55 टक्क्यांनी महागला. फळांच्या किमतीत लक्षणीय वाढ दिसून आली. भाजीपाला आणि फळांच्या किमती जूनमध्ये जास्त असतात, असे जाणकारांनी सांगितले. अंडी, मांस आणि मासळी हे प्रथिनयुक्त पदार्थ जूनमध्ये स्वस्त होते. कडधान्ये मात्र कडाडली. मेमध्ये धान्य महागाई 16.29 टक्के होती, जूनमध्ये ती 17.59 टक्के झाली.


औद्योगिक चक्र मंदावले
महागडे कर्ज, रुपयाची घसरण यामुळे जेरीस आलेल्या उद्योग क्षेत्राला उत्पादन वाढीतील घसरणीने पुन्हा धक्का दिला. निर्मिती आणि खाण क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) मे महिन्यात 1.6 टक्क्यांवर अडकला. गेल्या 11 महिन्यांतील हा नीचांक आहे.


एप्रिलमध्ये उत्पादन निर्देशांक 1.9 टक्के होता, तर गेल्यावर्षी मेमध्ये हा निर्देशांक 2.5 टक्के होता. केंद्रीय सांख्यिकी संस्थेने शुक्रवारी ही आकडेवारी जाहीर केली. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात 75 टक्के वाटा असणा-या निर्मिती क्षेत्राने मेमध्ये खराब कामगिरी करत 2 टक्के वाढ नोंदवली. गेल्यावर्षी याच काळात या क्षेत्राने 2.6 टक्के वाढ दर्शवली होती. खाण क्षेत्रातही यापेक्षा वेगळे चित्र नाही. खाण क्षेत्रात मे मध्ये 5.7 टक्के घसरण झाली.


निर्यातीची घसरगुंडी
निर्यातीची सुरू असलेली घसरगुंडी सलग दुस-या महिन्यात कायम राहिली असून ती 4.6 टक्क्यांनी घसरून 23.79 अब्ज डॉलरवर आली आहे. आयातीमध्येही 0.37 टक्क्यांनी घसरण होऊन ती याच महिन्यात 36 अब्ज डॉलरवर आली आहे. परिणामी व्यापार तूट 12.2 अब्ज डॉलर नोंद झाली आहे. मे महिन्यात व्यापार तूट 20.1 अब्ज डॉलर होती.
सोने आणि चांदीच्या आयातीमध्ये झालेली घट हे आयात आणि व्यापार तूट कमी होण्याचे मुख्य कारण असल्याचे विदेश व्यापार महासंचालक अनुप पुजारी यांनी सांगितले. जूनमध्ये सोने आणि चांदी आयात घसरून ती मे महिन्यातील 8.4 अब्ज डॉलरवरून .45 अब्ज डॉलरवर आली आहे. एप्रिल ते मे या कालावधीतही निर्यात 1.41 टक्क्यांनी घसरून ती 72.45 अब्ज डॉलरवर आली.