आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुगंधी द्रव्य व्यवसायातील मराठी ब्रॅँड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरात सुरू केलेल्या व्यवसायाचा दरवळ सातासमुद्रापार नेणारे भाऊसाहेब केळकर हा सुगंधी द्रव्य व्यवसायातील पहिला मराठी ब्रॅँड. केळकरांच्या पावलावर पाऊल टाकत त्यानंतर अनेक मराठी उद्योजकांनीदेखील आपला सुगंध देशाच्या बाहेर नेला. गेल्या 40 वर्षांपासून या व्यवसायात कार्यरत असलेल्या वैद्य कुटुंबालादेखील आता आपली सुगंधी पताका महाराष्टÑात नेण्याचे वेध लागले आहेत.


अत्तर व्यवसायाची पहिली कुपी 1972 मध्ये उघडली ती वेल्डिंग - फिटिंगमध्ये पारंगत असलेल्या गजानन वैद्य यांनी. नोकरी करून उरलेल्या वेळेत अत्तर विक्री इतकाच त्यामागे उद्देश. व्यवसायात लवकरच चांगला जम बसल्यानंतर वैद्य यांनी परफ्यूमचे ब्लेंडिग करण्यास सुरुवात केली. पुढील 20 वर्षांत डोंबिवलीत ‘हेमंत सुगंधी भंडार’ जवळपास सर्वांनाच परिचित झाले. वैद्य यांची आशिष आणि नारायण ही दोन्ही मुले पदवीधर झाल्यानंतर त्यांचीही या व्यवसायाला जोड मिळाली, पण दुकान अगदीच लहान असल्याने पडद्यामागून साथ इतकेच त्याचे मर्यादित स्वरूप होते. आशिष वैद्य यांनी एक मोठा दुकानाचा गाळा घेऊन या व्यवसायाचे पहिले विस्ताराचे पाऊल टाकले. कुटुंबातील जवळपास सर्वांचीच साथ आता मिळू लागल्याने मग अगरबत्ती, परफ्यूममध्ये झेरॉक्स, प्रिंटिंग या दोन नवीन व्यवसायाची भर पडली, परंतु 2010 नंतर हा व्यवसाय बंद करून केवळ परफ्यूमवरच त्यांनी लक्ष केंद्रित केले, पण हे करताना दर्जाशी तडजोड न करता सर्वोत्तम तेच ग्राहकांना द्यायचे हे वडिलांचे सूत्र आशिष आणि नारायण या दोन्ही बंधूंनी ‘एच.एस.बी.’च्या माध्यमातूनही जपले आहे. अत्तर ही पूर्वीच्या काळी हौस होती, पण आता ती लोकांची गरज झाली आहे. केवडा, चंदन, मोगरा या ठराविक पठडीतील सुगंधांच्या पलीकडे जात थेट आंतरराष्‍ट्रीय ब्रॅँडप्रमाणे नाही, पण त्याच्याशी समतुल्य असे अनेक नवीन सुगंध या बंधूंनी तयार केले. ते पसंतीस पडल्यामुळेच आज ‘एचएसबी’च्या ग्राहकांची संख्या 30 हजारांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. केवळ इतकेच नाही तर अत्तरासाठी प्लास्टिकची बाटली ही नवीन संकल्पना आणली. 30 मिलीच्या काचेच्या बाटलीचे वजन 90 ग्रॅम तर प्लास्टिकच्या बाटलीचे वजन फक्त 8 ग्रॅम असल्याने ती सहज कोठेही नेता येते. ग्राहकांना ही संकल्पना भावल्यानंतर आता स्वत:चे मोल्ड तयार करून प्लास्टिकची बाटली, वेष्टण, खोका याचे उत्पादन घरीच सुरू केले.


यंदाच्या वर्षापासून पेटच्या बाटल्यांमध्ये परफ्यूम देण्यास सुरुवात केली आहे. अत्तर व्यवसायातील नवी शिखरे पादाक्रांत करण्यासाठी आता वैद्य बंधूंना विस्ताराचे वेध लागले आहेत. ‘एचएसबी’ अर्थात ‘हॅपी सेंटेड बिगिनिंग’ या आपल्या ब्रॅँडचा ठसा महाराष्टÑात उमटवण्यासाठी सुरुवात झाली आहे. ‘फ्रॅँचायझीच्या माध्यमातून ‘एचएसबी’चा ब्रॅँड चा दरवळ येणा-या काळात राज्यात पोहोचवण्याचा आशिष वैद्य यांचा मानस आहे.