आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक कारणांनी बाजार उठला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सोमवारी सेन्सेक्स 426.11 अंकांनी कोसळला. अमेरिका फेडरल रिझर्व्ह, चीनमधील बँकांची दुरवस्था आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचे मंगळवारी जाहीर होणारे पतधोरण या कारणामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका लावला. त्यामुळे सेन्सेक्सने पाच महिन्यांतील 20,707.45 या नीचांकी पातळीची नोंद केली. निफ्टी 130.90 अंकांच्या घसरणीनंतर 6135.85 वर स्थिरावला. तिकडे डॉलरने रुपयाची धुलाई केली. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 44 पैशांनी घसरून 63.10 झाले. रुपयाचा हा दहा आठवड्यांचा नीचांक आहे.

जगातील घडामोडींमुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 235 अंकांच्या घसरणीसह खुला झाला. त्यातच गुंतवणूकदारांनी विक्रीचा धडाका लावल्याने ही घसरण वाढतच गेली. विक्रीचा जोर एवढा होता की सर्व दिग्गज समभागांना त्याचा फटका बसला. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 27 समभाग घसरले. रिझर्व्ह बँक मंगळवारी पतधोरणाचा आढावा घेणार आहे. त्यात प्रमुख व्याजदर वाढीची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने व्याजदरांशी निगडित समभागांना विक्रीचा सर्वाधिक फटका बसला. जानेवारीतील वायदा सौदापूर्तीची अखेर गुरुवारी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी नफा वसुलीवर भर दिल्याचा फटकाही शेअर बाजाराला बसला.

आशियातील प्रमुख शेअर बाजारांत घसरणीचे चित्र होते. युरोपातील बाजारही याला अपवाद नव्हते. शेअर बाजारातील विक्रीचा फटका मिड कॅप तसेच स्मॉल कॅप समभागांनाही बसला.

घसरलेले समभाग : टाटा मोटर्स, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, टाटा पॉवर, मारुती सुझुकी, अ‍ॅक्सिस बँक, सेसा स्टरलाइट, एचडीएफसी बँक, कोल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अँड टुब्रो, हिंदाल्को, ओएनजीसी, महिंद्रा अँड महिंद्रा

क्षेत्रीय निर्देशांकांना फटका : रिअ‍ॅल्टी (6.82 टक्के), बँकेक्स (3.97 टक्के घट), मेटल (03.81 टक्के घट), ऑटो (3.33 टक्के), पॉवर (3.01 टक्के), कॅपिटल गुड्स (2.70 टक्के), तेल आणि वायू (2.37 टक्के)

100 समभागांचा नीचांक
शेअर बाजारातील सोमवारच्या घसरणीचा फटका 100 हून जास्त समभागांना बसला. या समभागांनी 52 आठवड्यांचा नीचांक नोंदवला.

रुपया आपटून 63.10 वर
तेल रिफायनरी आणि बँकांकडून डॉलरला मोठी मागणी आल्याचा फटका सोमवारी रुपयाला बसला. डॉलरच्या तुलनेत रुपया 44 पैशांनी घसरून 63.10 वर आला. अमेरिका फेडरल रिझर्व्ह आणि अर्जेंटिनामधील पेसोच्या वृत्तामुळे डॉलर वधारल्याचा फटका रुपयाला बसल्याचे फॉरेक्स डीलसनी सांगितले. रुपयाने पुन्हा त्रेसष्टीत प्रवेश केला. हा रुपयाचा 10 आठवड्यांचा नीचांक आहे.

सोने चकाकले
जागतिक सराफा बाजारातील सकारात्मक संकेत आणि आगामी लग्नसराईमुळे आलेली मागणी यामुळे सोमवारी सोने चकाकले. राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 70 रुपयांनी वाढून 30,570 झाले. चांदी किलोमागे 75 रुपयांनी चकाकून 45,075 झाली. सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, जगभरातील शेअर बाजारात आलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदार पुन्हा मौल्यवान धातूकडे वळल्याचे चित्र आहे. सिंगापूर बाजारात सोने औंसमागे 0.8 टक्क्यांनी वाढून 1279.61 डॉलर झाले.

घसरणीची कारणे
- बाजाराचे सत्र सुरू असताना चीनमध्ये बँका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याचे वृत्त धडकले आणि गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले
- अमेरिका फेडरल रिझर्व्हची बैठक आहे. तीत रोखे खरेदीत कपातीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
- अर्जेंटिनाने पेसो या त्यांच्या चलनाला ओपन मार्केटमध्ये असलेला आधार काढून घेतला.
- भारतीय रिझर्व्ह बँक मंगळवारी पतधोरण आढावा घेणार आहे. त्यात प्रमुख व्याजदर वाढीच्या शक्यता
- डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण. रुपया दहा आठवड्यांच्या नीचांकावर.