आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारातील संकटाने बदलली गुंतवणूकदारांची चाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या गुंतवणुकीचे मूल्य घटल्याचा अनुभव गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना आला आहे. घाबरून काही गुंतवणूकदार बाजारापासून चार हात लांब झाले आहेत. ज्यांना टिकून राहण्याशिवाय पर्याय नाही असेच गुंतवणूकदार सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात दिसताहेत. बाजाराची स्थिती पाहता दीर्घकालीन गुंतवणुकीबाबतही अनेकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमुळे गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदारांच्या मानसिकतेत बदल झाला आहे. अशा प्रकारच्या स्थितीत गुंतवणूक सुरक्षित राखणे आवश्यक असते. त्याविषयी...
वित्तीय बाजारातील आपत्तीवेळीचे व्यवहार
1. जोखमीच्या क्षमतेत बदल : आर्थिक स्थिती डळमळली की सर्वप्रथम गुंतवणूकदाराच्या जोखमीच्या क्षमतेवर परिणाम होतो. अनेक गुंतवणूकदार एक ठरावीक लक्ष्य ठेवून बाजारात गुंतवणूक करतात. मात्र, संकटकाळात बाजारात घबराट होते. त्यामुळे त्यांची जोखमीची क्षमता घटते. अशा स्थितीत परताव्याऐवजी आपली मुद्दल सुरक्षित कशी राहील याकडे गुंतवणूकदार जास्त लक्ष केंद्रित करतो.
2. पोर्टफोलिओकडे लक्ष न देणे : आर्थिक संकटाच्या काळात आपल्या पोर्टफोलिओकडे लक्ष देणा-या गुंतवणूकदारांची संख्या खूपच कमी असते. अशा वेळी बाजारात फारच कमी हालचाल असते. अशात गुंतवणूकदार पोर्टफोलिओची नियमित चाचपणी करू शकत नाहीत. मात्र, बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होतात तेव्हा गुंतवणूकदार घाबरून जातो. जसे 2008 मध्ये झाले होते. तेव्हा गुंतवणूकदारांनी इक्विटीमधील पैसा काढून बाँडसारख्या साधनांत गुंतवणूक केली होती. सध्या गुंतवणूकदार सोन्याकडे वळतो आहे. संकटकाळात आपल्या पोर्टफोलिओकडे वेळोवेळी लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
3. चौकशी न करणे : संकटकाळात किंवा बाजारात वाईट परिस्थिती असताना चौकशी अर्थात रिसर्च आणि विश्लेषण अत्यंत आवश्यक असते. मात्र होते उलटे, अशा वेळी अफवा आणि बातम्यांकडे जास्त लक्ष दिले जाते. गुंतवणुकीवरील खर्चापेक्षा अशा वेळी नुकसान भरून काढणा-या व चांगला परतावा देणा-या पर्यायांचा शोध घेणे गरजेचे असते. अशा प्रकारची वर्तणूक जगातील सर्व बाजारांत अशा संकटकाळात दिसून आली आहे. अशा वेळी वेगळे धोरण आखण्याची गरज नसते. मात्र, आपला मूलभूत नियम न विसरता त्यानुसार वागणे जास्त फायद्याचे ठरते. हे कसे साध्य करता येईल ?
1. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा : संकटकाळात दीर्घकालीन गुंतवणुकीच्या लक्ष्यात बदल करू नका. अत्यंत अस्थिर श्रेणी दीर्घकाळात चांगला परतावा देतात असे आढळून आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणे केव्हाही चांगले.
2. अफवांकडे दुर्लक्ष करा : आपल्या विचाराच्या गतीपेक्षा अफवा जास्त गतीने परसत असतात. मात्र, आपल्या आर्थिक स्थितीबाबत अफवा लागू होतील असे नव्हे. अशा अफवांकडे दुर्लक्ष करा.
3. पोर्टफोलिओची तपासणी करा : आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने परिस्थितीनुसार पोर्टफोलिओची नियमित तपासणी करा. आपल्या असेट अलोकेशनवर लक्ष ठेवा आणि गरज भासल्यास त्यात योग्य बदल करा. असे केल्याने आपले दीर्घकालीन लक्ष्य कायम राखले जाते.
4. योग्य सल्लागार निवडा : संकटकाळात आपली गुंतवणुकीच्या सुरक्षिततेसाठी आणि परताव्यासाठी योग्य सल्लागाराची निवड करा. जो चांगला सल्ला तर देईलच, शिवाय गुंतवणुकीचे रक्षणही करेल, असा सल्लागार निवडा. त्यांच्या सल्ल्यानुसार पोर्टफोलिओ तयार करा. आर्थिक अरिष्ट दीर्घ कालावधीसाठी एक उत्तम संधीही सिद्ध होऊ शकते. मात्र, त्यासाठी आपला शोध सातत्याने सुरू राहिला पाहिजे आणि संधी मिळताच ती साधली पाहिजे. आपले गुंतवणुकीचे धोरण बदलण्याऐवजी आपल्या उद्दिष्टानुसार पोर्टफोलिओत सातत्याने सुधारणा करणे हिताचे ठरते.


लेखक मान्यताप्राप्त गुंतवणूक मार्गदर्शक असून द फायनान्शियल प्लॅनर्स इंडियाचे सदस्य आहेत.
jp.solanki@dainikbhaskargroup.com