आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात घसरण, 49 पैशांच्या कमाईसह रुपया 59 च्या घरात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आशियाई, युरोप शेअर बाजारातील नरमाईमुळे मूड गेलेल्या गुंतवणूकदारांनी रिलायन्स, महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा, बजाज ऑटोसारख्या बड्या समभागाची अखेरच्या सत्रात विक्री करून नफा पदरात पाडून घेतला. परिणामी सकाळच्या सत्रातील कमाई धुऊन निघून सेन्सेक्सची 145 अंकांनी घसरगुंडी झाली. सेबी तसेच रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपानंतर रुपया सलग दुस-या दिवशी समाधानकारक सुधारणेसह 59 च्या घरात स्थिरावला. जागतिक नकारात्मक संकेतामुळे सोने आणि चांदी स्वस्त झाले.


मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक मंगळवारच्या 19,489 अंकांच्या बंद पातळीच्या तुलनेत सकाळच्या सत्रात काहीसा वरच्या पातळीवर उघडला. खरेदीच्या पाठिंब्यामुळे 50 अंकांची वाढही सेन्सेक्सने नोंदवली होती, परंतु जागतिक शेअर बाजारातील घसरणीने ही कमाई धुऊन निघाली.


दिवसअखेर सेन्सेक्स 145.36 अंकांनी घसरून 19,294.12 अंकांच्या पातळीवर बंद झाला. तीन जुलैनंतर सेन्सेक्स गाठलेली ही खालची पातळी आहे. मंगळवारी सेन्सेक्समध्ये 114.7 अंकांची वाढ झाली होती. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 42.30 अंकांनी घसरून 5816.70 अंकांच्या पातळीवर बंद झाला.


चीनच्या आयात निर्यातीत अचानक झालेल्या घसरगुंडीमुळे आशियाई शेअर बाजारात घसरण झाली. बाजारावर या घडामोडीचा परिणाम झाला, परंतु त्याच्याच जोडीला रुपयाच्या चलनातील चढ उतार रोखण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी एकाच बॅँकेतून डॉलरची खरेदी करावी असा आदेश रिझर्व्ह बॅँकेने दिल्यामुळे रिफायनरी समभागांवर ताण आला. त्यामुळे बाजारात झालेल्या नफारूपी विक्रीत प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ओएनजीसी यासह अन्य रिफायनरी समभागांची पडझड झाली.


गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा
कंपन्यांचे पहिल्या तिमाहीतील आर्थिक निकाल जाहीर होण्यास सुरुवात होणार असून त्याचा पहिला नारळ इन्फोसिस शुक्रवारी फोडणार आहे. त्यामुळे या निकालांकडे गुंतवणूकदारांचे डोळे लागले आहेत.


शुक्रवारीच औद्योगिक उत्पादन आणि ग्राहक महागाईची आकडेवारी जाहीर होणार आहे, तर सोमवारी घाऊक
महागाईचा कल समजणार आहे. या सर्व महत्त्वाच्या घडामोडी तसेच चलन बाजारातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी आतापासून सावध पवित्रा घेतला आहे.


रुपया 59.65 वर
डॉलरच्या तुलनेत रुपयाची होणारी घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक तसेच बाजार नियामक व नियंत्रक सेबीने पावले उचलली. परिणामी रुपयाने सलग दुस-या दिवशी चांगली कामगिरी नोंदवत 59.65 पातळी गाठली. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाने 49 पैशांची कमाई केली. जागतिक बाजारात डॉलरच्या अवमूल्यनाचा फायदा रुपयाला झाल्याचे फॉरेक्स डीलर्सनी सांगितले. विदेशी संस्थांनी केलेल्या समभाग खरेदीचाही लाभ रुपयाला झाल्याचे निरीक्षण डीलर्सनी नोंदवले. इंडिया फॉरेक्स अ‍ॅडव्हायझर्सचे सीईओ अभिषेक गोयंका म्हणाले, रिझर्व्ह बँकेने उचललेली पावले आणि युरोमध्ये झालेली सुधारणा रुपयाची घसरण थांबवण्यास कारणीभूत ठरले.


सोने स्वस्त, चांदी घसरली
जागतिक सराफा बाजारातील नकारात्मक संकेतामुळे सोने व चांदी घसरले. राजधानीतील सराफ्यात सोने तोळ्यामागे 115 रुपयांनी स्वस्त होऊन 26,715 वर स्थिरावले. चांदी किलोमागे 400 रुपयांनी घसरून 40,350 झाली. मुंबई सराफ्यात सोने 85 रुपयांनी स्वस्त होऊन 26,345 झाले. अमेरिकेतील फेडरल ओपन मार्केट समितीने फेडरल रिझर्व्हकडे पॅकेज कपात करण्याची शिफारस केली आहे. परिणामी गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक कमी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा फटका या मौल्यवान धातूला बसत आहे. सिंगापूर बाजारात सोने औंसमागे 0.6 टक्के घटून 1244.03 डॉलर झाले. चांदी औसमागे 19.03 डॉलर झाली.