आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विक्रीच्या मार्‍याने तेजीला ग्रहण, दिग्गज समभागांच्या विक्रीने सेन्सेक्स 251 अंकांनी आपटला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या किमती वाढवण्याचा निर्णय पुढे ढकलल्याने ओएनजीसी आणि रिलायन्ससारख्या दिग्गज समभागांची विक्री करण्यावर गुंतवणूकदारांचा भर राहिला. त्यातच वायदा सौदापूर्तीची गुरुवारी अखेरची मुदत असल्याने गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्याने बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्स 251.07 अंकांनी घसरून 25,065.67 वर आला. मागील सहा सत्रांतील ही सर्वात मोठी घसरण आहे. निफ्टी 76.05 अंकांच्या घसरणीसह 7493.20 वर स्थिरावला. हा निफ्टीचा तीन आठवड्यांचा नीचांक आहे.
ब्रोकर्सनी सांगितले, तेल आणि नैसर्गिक वायूसंबंधी कंपन्यांशिवाय रिअँल्टी, बँकिंग आणि धातू कंपन्यांच्या समभागांच्या विक्रीने निर्देशांकाला खाली आणले. विक्रीचा मारा एवढा जोरात होता की दिवसभरात एकदाही सेन्सेक्स व निफ्टीने वाढीचा कल दर्शवला नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने बुधवारी नैसर्गिक वायूच्या किंमतवाढीला मुदतवाढ दिली. परिणामी, तेल आणि नैसर्गिक वायू निर्मिती क्षेत्रातील समभागांच्या विक्रीवर गुंतवणूकदारांचा कल राहिला. तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रीय निर्देशांकातील सर्व 10 समभागांत 0.81 टक्के ते 5.89 टक्के इतकी घसरण झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ओएनजीसी या समभागांच्या विक्रीने सेन्सेक्सच्या घसरणीत 150 अंकांची भर घातली. एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, टाटा मोटर्स आदी समभागांनाही विक्रीचा फटका बसला.
अमेरिकेतील अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करण्याची शक्यता असल्याने आशियातील प्रमुख बाजारात सकारात्मक कल दिसून आला. युरोपातील प्रमुख बाजारात संमिर्श कल होता.

रुपया घसरला
महिनाअखेर असल्याने आयातदारांकडून गुरुवारी डॉलरला चांगली मागणी आल्याचा फटका रुपयाला बसला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य दोन पैशांनी घटून 60.14 झाले. जागतिक पातळीवर डॉलर मजबूत झाल्याचा फटकाही रुपयाच्या मूल्याला बसला. यामुळे दोन दिवसांतील रुपयाच्या कमाईवर पाणी पडले.

सोने घसरले, चांदी चकाकली
नवी दिल्ली । जागतिक सराफा बाजारातली नकारात्मक कल आणि ज्वेलर्सकडून मागणी घटल्याने गुरुवारी सोन्याच्या किमती घसरल्या. राजधानीतील सराफा बाजारात सोने तोळ्यामागे 50 रुपयांनी घटून 28,660 झाले. औद्योगिक क्षेत्रातून मागणी आल्याने चांदी मात्र चकाकली. चांदी किलोमागे 200 रुपयांनी वाढून 45,000 झाली. चांदीचा हा तीन महिन्यांतील उच्चांक आहे. सराफा व्यापार्‍यांनी सांगितले, किरकोळ व्यापारी व ज्वेलर्सकडून मागणी घटल्याने सोन्यावर दबाब आला. त्यातच जागतिक सराफ्यातील नकारात्मक संकेताने सोने घसरले. लंडनच्या सराफ्यात सोने औंसमागे 0.6 टक्क्यांनी घसरून 1311.65 डॉलरवर आले.
मान्सूनची चिंता
गॅसची किंमतवाढ पुढे ढकलल्याच्या निर्णयाला बाजारात नकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यातच मान्सूनने मारलेली दडी गुंतवणूकदारांसाठी धास्तीची ठरत आहे. त्यामुळेही बाजारात विक्रीचा कल दिसला. राकेश गोयल, वरिष्ठ उपाध्यक्ष, बोनान्झा पोर्टफोलिओ

टॉप लुझर्स : एनटीपीसी, कोल इंडिया, एचडीएफसी, गेल इंडिया, एचडीएफसी बँक, एसबीआय, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर

टॉप गेनर्स : विप्रो, लार्सन अँड टुब्रो, डॉ. रेड्डीज लॅब., अँक्सिस बँक, भेल.
आघाडीच्या समभागांना फटका