आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारकडून घोषणांची बाजाराला अपेक्षा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुपयाच्या घसरणीने शेअर बाजारात चढ-उताराची स्थिती आहे. त्यातच विदेशी फंडांनी सातत्याने विक्रीचा धडाका लावल्याने प्रमुख निर्देशांक धोक्याच्या आधार पातळीखाली आले आहेत. मोठ्या विक्रीनंतर खालच्या पातळीवर मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याने बाजार ओव्हरसोल्ड झोनच्या बाहेर आला आहे. मात्र, नव्या कळीच्या मुद्द्यांअभावी बाजार अजूनही विक्रीच्या दबावात आहे.


रिझर्व्ह बँकेच्या मध्य तिमाही पतधोरण आढाव्याकडे बाजार डोळे लावून बसला होता. बाजाराच्या दृष्टीने हा आढावा निष्फळ ठरला. आरबीआयने व्याजदर ‘जैसे थे’ ठेवत आगामी काळात कपातीचे संकेत दिले.


आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन आणि युरोपीय समुदायाकडून कमजोर संकेत मिळाले. अमेरिकेत फेडरल रिझर्व्हकडून रोखे खरेदीत कपातीबाबत अद्याप संभ्रम कायम आहे. आर्थिक आकडेवारीनुसार सध्या यापासून फारसा धोका नाही. फेडरल रिझर्व्ह आपली रोखे खरेदी योजना ‘जैसे थे’ ठेवण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्हच्या ओपन मार्केट समितीची बैठक बुधवारी होऊन तीत फेडरलचा कल स्पष्ट होईल. यातून भारतासह जगभरातील शेअर बाजारांना नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. मुद्रा बाजारपासून ते शेअर बाजारावर परिणामकारक ठरणा-या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष आहे. यामुळेच मंगळवारी बँकेचे समभाग आणि रुपयात घसरण दिसून आली.


देशातील शेअर बाजारात सकारात्मक वातावरणाबरोबरच सतर्कता दिसते आहे. फेडरल रिझर्व्हचा निर्णय बाजारासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. समितीचा निर्णय नकारात्मक आला तरी निर्देशांक खालच्या पातळीपर्यंत घसरण्याची शक्यता कमी आहे. कारण येत्या काही दिवसांत केंद्र सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. यातून शेअर बाजारासह मुद्रा बाजारालाही चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे.


निफ्टीला पुढील अडथळा 5872 या पातळीवर होण्याची शक्यता आहे. निफ्टी या पातळीवर बंद झाल्यास बाजारात तेजीचे ते द्योतक समजावे. त्यानंतर निफ्टीला 5972 वर अडथळा होण्याची शक्यता आहे. या पातळीवर काही प्रमाणात कन्सोलिडेशन किंवा नफेखोरीची शक्यता आहे. निफ्टी 5972 पातळीवर स्थिरावला नाही तर तो 6059 चा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.


खालच्या स्तरावर निफ्टीला 5791 वर चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे. या पातळीखाली निफ्टी बंद होणे म्हणजे मंदीची पकड घट्ट झाल्याचे संकेत समजावेत. अशा स्थितीत निफ्टी 5738 पर्यंत खाली येऊ शकतो. ही एक चांगली आधार पातळी आहे. त्यानंतर निफ्टीला 5712 वर चांगला आधार आहे.


या आठवड्यात स्टरलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड, जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे समभाग चार्टवर उत्तम वाटताहेत. स्टरलाइट इंडस्ट्रीजचा मागील बंद भाव 83.10 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 86 रुपये आणि स्टॉप लॉस 80 रुपये आहे. जिंदाल स्टील अँड पॉवरचा मागील बंद भाव 239.85 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 247 रुपये आणि स्टॉप लॉस 231 रुपये आहे. तर एम अँड एमचा मागील बंद भाव 983.75 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 1006 रुपये आणि स्टॉप लॉस 964 रुपये आहे.


लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.
vipul.verma@dainikbhaskargroup.com