आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Market Opened With A Small Decline In Nifty And Sensex

शेअर बाजारात तेजीला ओहोटी; सेन्सेक्स, निफ्टीत सलग तिसर्‍या सत्रात घसरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सोमवारी झाले. मतदानामुळे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. जागतिक बाजारातही नकारात्मक संकेत होते. परिणामी सेन्सेक्स, निफ्टीत घसरण झाली. रिअ‍ॅल्टी, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्री झाल्याने सेन्सेक्सवर दबाव आला. सेन्सेक्स 16.05 अंकांच्या घसरणीसह 22343.45 वर बंद झाला, तर निफ्टी 0.70 या किरकोळ घसरणीसह 6695.05 वर स्थिरावला.
ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागांची गुंतवणूकदारांनी जोरदार विक्री केल्याने एकवेळ सेन्सेक्स 160 अंकांनी खाली आला होता. नंतर निवडक समभागांत झालेल्या विक्रीने सेन्सेक्सला तारले. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. त्याचाही परिणाम बाजारावर दिसून आला. रॅनबक्सी आणि सन फार्मा यांच्यातील विलीनीकरण कराराचे प्रतिबिंबही बाजारात उमटले. सन फार्माचा समभाग 2.68 टक्क्यांनी तर रॅनबक्सीचे शेअर्स 9.89 टक्क्यांनी वाढले. रॅनबक्सीने 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. त्यानंतर मात्र या समभागाला नफेखोरीचा फटका बसला आणि समभाग 3.12 टक्क्यांनी घसरला. सार्वजनिक क्षेत्रातील भेल कंपनीने प्रस्तावित आर्थिक निकालाची आकडेवारी जाहीर केली. अपेक्षाभंग करणार्‍या आकडेवारीमुळे भेलचे समभाग 3.32 टक्क्यांनी घसरले. सेन्सेक्सच्या यादीतील 16 समभाग घसरले तर 14 समभाग चमकले. आशियातील प्रमुख बाजारात घसरण दिसून आली. युरोपातील प्रमुख शेअर बाजारातही वेगळी स्थिती नव्हती.
टॉप लुझर्स : भेल, सिप्ला, आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डीज लॅब, मारुती सुझुकी, एनटीपीसी, अ‍ॅक्सिस बँक.
रुपया घसरला : डॉलरच्या तुलनेत सोमवारी रुपया तीन पैशांनी घसरून 60.11 या पातळीवर स्थिरावला. शेअर बाजारात सातत्याने सुरू असलेल्या विदेशी निधीच्या ओघाने रुपयाची अधिक पडझड थांबवल्याचे मत फॉरेक्स डिलर्सनी व्यक्त केले.
आज बाजार बंद
रामनवमीनिमित्त मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराला सुटी आहे. त्यामुळे मंगळवार, 8 एप्रिल रोजी दोन्ही शेअर बाजारांत व्यवहार होणार नाहीत.