आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या तालावर बाजारात तेजीचा भांगडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या केंद्रीय बँकेचे प्रमुख बेन बर्नाके यांनी आर्थिक पॅकेज सुरू राहण्याचे संकेत दिले. अमेरिकेला आर्थिक मदत सुरू ठेवण्याच्या तालाने दलाल स्ट्रीटवर तेजीने भांगडा केला. या वृत्ताने खुश झालेल्या गुंतवणूकदारांनी गुरुवारी उत्साही खरेदी केली. त्यामुळे सेन्सेक्स 381.94 अंकांनी वाढून 19676.06वर पोहोचला. निफ्टीने 118.40 अंकांची कमाई करत 5935.10 ही पातळी गाठली. सेन्सेक्सचा हा सहा आठवड्यांचा उच्चांक आहे.
फेडरल रिझर्व्हच्या रोखे खरेदी सुरू ठेवण्याच्या निर्णयामुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी हात मोकळा सोडत खरेदी केली. सतर्क असलेल्या गुंतवणूकदारांनी तिमाही निकालापूर्वी दिग्गज समभागांची खरेदी केली. मुंबई शेअर बाजारात 1358 समभाग तेजीत होते, तर 974 समभागांत घसरण दिसली. क्षेत्रीय निर्देशांकांतही तेजी आली. एकूण 13 पैकी 12 क्षेत्रीय निर्देशांक चमकले. धातू, बँकिंग, रिअ‍ॅल्टी, भांडवली वस्तू, रिफायनरी व सार्वजनिक
उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांना जोरदार मागणी होती. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 27 समभागांत तेजी दिसून आली.


आशियातील प्रमुख बाजारातही तेजीचे वातावरण होते. चीन, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान येथील बाजार 0.39 ते 3.23 टक्के वधारले. युरोपातील बाजारांनीही सकारात्मक वाढ नोंदवली.


गुंतवणूकदार 1 लाख कोटींनी श्रीमंत
बाजारात गुरुवारी आलेल्या मोठ्या तेजीने गुंतवणूकदारांच्या श्रीमंतीत एक लाख कोटी रुपयांची भर टाकली. बाजारातील गुंतवणूकदारांची संपत्ती आता 64.9 लाख कोटी झाली आहे.
तेजीचे मानकरी : स्टरलाइट इंड., हिंदाल्को, एचडीएफसी बँक, भारतची एअरटेल, हीरो मोटोकॉर्प, कोल इंडिया, टीसीएस, एचडीएफसी, ओएनजीसी, एल अँड टी, टाटा पॉवर, आयटीसी, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, गेल इंडिया, एसबीआय,
रिलायन्स, एनटीपीसी


सोन्याची झळाळती उसळी
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या संकेताचा परिणाम सराफा बाजारावर दिसून आला. जागतिक बाजारातील तेजीमुळे सोने, चांदीने झळाळत उसळी घेतली. राजधानीतील सराफा बाजारात सोन्याची किंमत तोळ्यामागे 610 रुपयांनी वाढून 27,325 झाली, तर चांदीने किलोमागे 1400 रुपयांची कमाई करत 41,750 ही पातळी गाठली. सिंगापूर बाजारात सोने औंसमागे 3.1 टक्के वाढून 1298.73 डॉलर झाले. युरो आणि जपानी येनच्या तुलनेत डॉलरचे मूल्य घसरल्याचा फायदा या दोन्ही मौल्यवान धातूंना झाला.


फेडरलचा परिणाम
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने आर्थिक पॅकेज जारी ठेवण्याचे संकेत दिल्याने बाजारात दिवसभर तेजीचे वातावरण राहिले. सर्व दृष्टीने मजबूत असलेल्या समभागांची खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे.
मोतीलाल ओसवाल, सीएमडी, ओसवाल फायन्शियल सर्व्हिसेस.