आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाच्या अवमूल्यनाच्या फटक्याने बाजारात घसरणीचा पाऊस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रुपयाच्या अवमूल्यनाच्या ढगांनी दलाल स्ट्रीटवर केलेल्या घसरणीच्या पावसाने बाजारातील मंदीचा मुक्काम वाढला. सोमवारी सेन्सेक्स 233.35 अंकांनी गडगडला. घसरणीच्या या पावसात गुंतवणूकदारांची 1.1 लाख कोटींची श्रीमंती वाहून गेली. चीन आणि युरोपातील प्रमुख बाजारांतील नकारात्मक संकेतांनी घसरणीच्या पावसाला आणखी धार आली. त्यामुळे सेन्सेक्सला 18,540.89 अशी दोन महिन्यांतील नीचांकी पातळी पाहावी लागली.


डॉलरच्या तुलनेत होणारी रुपयाची घसरण थांबायचे नाव घेत नसल्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. आयटीसी, एल अँड टी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस,ओएनजीसी, एसबीआय, भारती एअरटेल, टीसीएस, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या दिग्गज समभागाच्या विक्रीने सेन्सेक्सच्या घसरणीला अधिक बळ आले. बाजारातील सर्व 13 क्षेत्रीय निर्देशांक रेड झोनमध्ये आले. रिअ‍ॅल्टी, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, भांडवली वस्तू, सार्वजनिक उद्योग आणि एफएमसीजी या निर्देशांकात 0.89 ते 4.79 टक्के घसरण दिसून आली.


राष्ट्रीय शेअर बाजारातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. विक्रीच्या धडाक्यात निफ्टीने 77.40 अंक गमावत 5,590.25 ही पातळी गाठली. विदेशी वित्तीय संस्थांनी (एफआयआय) जोरदार विक्रीचा धडाका सुरूच ठेवल्याने बाजारात घसरणीचे वातावरण असल्याचे निरीक्षण ब्रोकर्सनी नोंदवले. कोर्टातील प्रकरणामुळे रॅनबक्षीच्या समभागात 7 टक्के घसरण झाली.


उत्तराखंडातील प्रकल्प बंद पडल्याने जे.पी. समूहाच्या समभागांना फटका बसला. गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीचा तडाखा काही मिड-कॅप समभागांनाही बसला. गीतांजली जेम्स, फ्यूचर रिटेल आणि प्रेस्टिज इस्टेटचे समभाग 10 ते 20 टक्क्यांनी घसरले.


गुंतवणूकदारांना 1.1 लाख कोटींचा फटका
सोमवारी शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची श्रीमंती 1.1 लाख कोटींनी कमी झाली. विदेशी वित्तीय गुंतवणूकदार संस्थांनी जूनमध्ये आतापर्यंत 5 अब्ज डॉलर बाजारातून काढून घेतले आहेत. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 24 समभाग घसरले.


आशियातील बाजारात पडझड
आशियातील प्रमुख बाजारात पडझड झाली. शांघाय कॉम्पोझिट इंडेक्स 5.30 टक्के, हँगसेंग 2.22 टक्के, निक्की 1.26 टक्के, सिंगापूर स्ट्रेट टाइम्स 1.60 टक्के, तर कोस्पी निर्देशांक 1.31 टक्क्यांनी घसरले. युरोपातील प्रमुख बाजारात यापेक्षा वेगळे चित्र नव्हते.


घसरलेले समभाग
स्टरलाइट इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, भेल, ओएनजीसी, एल अँड टी, हीरो मोटोकॉर्प, आयटीसी, एसबीआय, गेल इंडिया, टाटा स्टील, बजाज ऑटो, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हर.