आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्ताहाची अखेर विक्रमाने : सेन्सेक्स, निफ्टी सर्वकालीन उच्चांकांवर बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आर्थिक वाढीस पूरक अर्थसंकल्पाच्या आशेने गुंतवणूकदारांनी शुक्रवारी शेअर बाजारात केलेल्या भरभरून खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने सर्वकालीन उच्चांकांची नोंद केली. तेल आणि नैसर्गिक वायू तसेच रेल्वे कंपन्यांच्या समभागांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. परिणामी सेन्सेक्स 138.31 अंकांनी वाढून 25,962.06 वर बंद झाला. निफ्टी 36.80 अंकांच्या कमाईसह 7751.60 वर स्थिरावला.
जागतिक पातळीवर अमेरिकेतील आकडेवारी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे बाजारातील वातावरण सकारात्मक बनले. त्यातच रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँक या दिग्गज समभागांतील खरेदीमुळे निर्देशांकातील तेजीला बळ मिळाले. तेल मंत्रालयाने गॅस, रॉकेलच्या किंमतवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवल्याच्या वृत्तामुळे तेल आणि गॅससंबंधी समभागांना चांगली मागणी आली. त्यातच विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी चांगली खरेदी केली.
गुरुवारीही या संस्थांनी बाजारातून 950.82 कोटींच्या समभागांची खरेदी केल्याचे सेबीच्या आकडेवारीत म्हटले आहे.

आशियातील प्रमुख शेअर बाजारात संमिश्र कल दिसून आला. हाँगकाँग, जपानचे बाजार वधारले, तर चीन, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान बाजारात घसरण झाली. युरोपातील प्रमुख शेअर बाजारांत घसरणीचा कल होता.
तेजीचा कल
सप्ताहाची अखेर उच्चंकांनी झाली. पंतप्रधान व अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे बाजारात उत्साह आला. रेल्वेचे अत्याधुनिकीकरण आणि महागाई नियंत्रणासाठी ठोस पावले या संकेतांमुळे बाजारातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. - दीपेन शहा, संशोधन प्रमुख, कोटक सिक्युरिटीज