आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारुतीची पुढील वर्षात चार हजार कोटींची गुंतवणूक, संशोधन-विकास-विपणनावर वाढीव खर्च

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मोटार निर्मिती क्षेत्रात मारुती सुझुकीने पुढील आर्थिक वर्षात जवळपास चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने नवीन वाहने, विपणन आणि संशोधन-विकासावर खर्च करण्यात येणार आहे.
गुजरातमधील प्रस्तावित उत्पादन प्रकल्पाच्या नवीन प्रस्तावाशिवाय पुढील वर्षात ही गुंतवणूक करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे.वाहन बाजारातील मरगळ आणि वाढती स्पर्धा लक्षात घेऊन मारुती सुझुकीने वाहन बाजारातील आपले स्थान आणखी मजबूत करणे आणि विक्रीला गती देण्यासाठी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे.
संचालक मंडळाने पुढील आर्थिक वर्षासाठी चार हजार कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाच्या कार्यक्रमाला मंजुरी दिली आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने नवीन वाहने बाजारात आणणे, पायाभूत सुविधा मजबूत करणे तसेच संशोधन आणि विकासावर खर्च करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. विद्यमान आर्थिक वर्षात 31 मार्च अखेरपर्यंत कंपनीचा भांडवली खर्च तीन हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे.
कंपनी हरियाणातील रोहतक येथील आपल्या संशोधन आणि विकासाला बळकटी देणार आहे. या ठिकाणी वाहनांच्या चाचणीसाठी मार्गिका बांधण्यात येणार असून हा प्रकल्प 600 एकरपेक्षा जास्त जागेवर उभारण्यात येत आहे. नवीन वाहने बाजारात लवकर यावीत या उद्देशाने मारुती या संशोधन केंद्राची क्षमता वाढवत आहे.
एसएक्स फोर एस क्रॉस, सियाझ, एसयूव्ही पुढील वर्षात
मागील महिन्यात नवी दिल्लीत झालेल्या ऑटो एक्स्पो प्रदर्शनात कंपनी सेलेरियो ही हॅचबॅक मोटार बाजारात आणली. त्याचबरोबर एसएक्स फोर एस क्रॉस आणि सियाझ या मोटारी देखील प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. यापैकी एसएक्स 4 एस क्रॉस ही पुढच्या वर्षात बाजारात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कंपनी छोटेखानी एसयूव्ही विकसित करण्याच्या तयारीत असून, तीदेखील पुढील वर्षाच्या प्रारंभी बाजारात येण्याचा अंदाज आहे.