आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐन मंदीत मारुती-सुझुकी, होंडा, फोर्डच्या विक्रीचा थर्ड गिअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वाहन बाजारातील सध्याच्या मंदीच्या वातावरणावर मात करीत मारुती सुझुकी, होंडा आणि फोर्ड या कंपन्यांनी जुलै महिन्यात मोटार विक्रीचा थर्ड गिअर टाकला; परंतु टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि जनरल मोटर्स यांच्यासाठी मात्र हा महिना घसरणीचा ठरला.

मारुती 800, अल्टो, ए- स्टार, वॅगन आर, छोटी सेडान डिझायर या वाहनांना चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे मारुती सुझुकीला विक्रीची बाजी मारता आली. होंडा कार्स इंडियाला अमेझ या वाहन बाजारपेठेत नव्याने आलेल्या मोटारीची साथ मिळाली. फोर्ड इंडिया इकोस्पोर्ट्स या नव्या एसयूव्हीमुळे विक्रीच्या बाजारपेठेत तरली गेली.

मारुती सुझकी इंडियाच्या मोटारींच्या विक्रीमध्ये 5.8 टक्क्यांनी वाढ होऊन ती गेल्या वर्षातल्या जुलै महिन्यातील 71,024 मोटारींवरून 75,145 मोटारींवर गेली आहे. कंपनीच्या छोट्या मोटारींच्या विक्रीत 15.8 टक्क्यांनी वाढ होऊन ती 33,587 मोटारींवर गेली आहे. डिझायरच्या विक्रीत 33.6 टक्क्यांनी वाढ होऊन ती 15,249 मोटारींवर गेली आहे.

होंडा कार्स इंडिया लिमिटेडच्या विक्रीत जवळपास अडीचपटीने वाढ होऊन ती 11,223 मोटारींवर गेली आहे. होंडा अमेझ या मोटारीने सर्वाधिक चांगली कामगिरी करताना 6,515 मोटारींच्या विक्रीची नोंद केली आहे. ही मोटार वाहन बाजारात आल्यापासून आतापर्यंत 24 हजार अमेझची विक्री झाल्याबद्दल कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष (विपणन आणि विक्री) जनेश्वर सेन यांनी समाधान व्यक्त केले.

फोर्ड इंडियाच्या स्थानिक बाजारपेठेतील विक्रीमध्ये लक्षणीय 26.15 टक्क्यांनी वाढ होऊन ती अगोदरच्या 6,236 मोटारींवरून यंदाच्या जुलैमध्ये 7,867 मोटारींवर गेली आहे. अर्थव्यवस्थेची नजीकच्या काळात कठीण वाटचाल सुरू असतानादेखील आमच्या ग्राहकांनी इकोस्पोर्ट्स एसयूव्ही आणि फिगो या मोटारींवर व कंपनीवर विश्वास दाखवला.


विक्रीची वाट बिकटच
अन्य मोटार कंपन्यांसाठी मात्र इंधनाचा वाढलेला खर्च, ग्राहकांची कमी झालेली मानसिकता, मरगळलेली आर्थिक वाढ यामुळे विक्रीची वाटचाल खडतर झाली आहे. याचा फटका वाहननिर्मिती क्षेत्रातील अग्रेसर टाटा मोटर्सला बसला आहे. टाटा मोटर्सची एकूण प्रवासी वाहनांची विक्री 58.75 टक्क्यांनी घसरून ती अगोदरच्या वर्षातल्या 26,240 मोटारींवरून 10,824 मोटारींवर आली आहे. त्याचप्रमाणे महिंद्रा अँड महिंद्राच्या विक्रीत 19.41 टक्क्यांनी घट होऊन ती 42,799 मोटारींवरून 34,490 मोटारींवर आली आहे. टोयोटा किलरेस्करच्या मोटार विक्रीत 20.98 टक्क्यांनी घसरण होऊन ती अगोदरच्या वर्षातल्या याच महिन्यातील 14,574 मोटारींवरून 11,515 मोटारींवर आली आहे. त्याचप्रमाणे जनरल मोटर्सची विक्रीदेखील 10.73 टक्क्यांनी घसरून ती अगोदरच्या वर्षातल्या 7,285 मोटारींवरून 6,503 मोटारींवर आली आहे.