आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रेडिट स्कोअरवर परिणाम करणा-या बाबी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या देशात क्रेडिट स्कोअरला जास्त महत्त्व दिले जात नाही, अशा आविर्भावात तुम्ही कर्ज घेण्यासाठी बँकेत जाल तर तुमचा समज खोटा ठरेल. केवळ पाश्चिमात्य देशांतच क्रेडिट स्कोअरला महत्त्व दिले जाते असे नाही, तर आपल्या देशातील बँकाही आता क्रेडिट स्कोअरला चांगले महत्त्व देतात. तुम्ही-आम्ही भले आपल्या दैनंदिन खर्चाच्या नोंदी ठेवत नसू, मात्र घेतलेले कर्ज आणि क्रेडिट कार्डद्वारे खर्च केलेल्या रकमेचा एक डाटाबेस तयार होत असतो. ज्या-ज्या वेळी आपण कर्ज घेण्यासाठी बँकेत जातो त्या वेळी यापूर्वीच्या कर्जाची फेड कशी केली आणि चुकांबाबत आपण किती जागरूक आहोत याची तपासणी केली जाते. भारतात क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड (सिबिल) कर्ज आणि क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खर्चाच्या नोंदी ठेवण्याचे काम करते. त्याच बरोबर सिबिल क्रेडिट स्कोअरही देते. बँका तसेच इतर वित्तीय संस्थांना सिबिल हा क्रेडिट स्कोअर दरमहा देते. क्रेडिट स्कोअरवर दोन बाबी प्रामुख्याने परिणामकारक ठरतात. त्याबाबत नेहमी दक्ष राहावे. पहिली बाब बोरोइंग म्हणजेच कर्जरूपात मिळणारी पात्र रक्कम. दुसरी बाब म्हणजे क्रेडिट म्हणजेच कर्जरूपाने मिळणारी वास्तव रक्कम अर्थात तुमची पत.


क्रेडिट मोजण्याची प्रक्रिया : हे व्यवस्थित समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ. मुकेश मुंबईत काम करणारे सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे दोन वेगवेगळ्या बँकांचे क्रेडिट कार्ड आहेत. प्रत्येक कार्डाची लिमिट एक लाख रुपये आहे. याचाच अर्थ ते आपल्या लिमिटपैकी 80 टक्के वापर करू शकतात. त्यांना वाटले तर ते एक लाखाची लिमिटही वापरू शकतात, परंतु तसे करणे हितावह नाही. असे केल्याने क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल. आपल्या क्रेडिट लिमिटचा 50 टक्के वापर योग्य राहील. समजा, मुकेश यांना 80 हजार रुपयांची निकड आहे तर ते एकाच कार्डवरून न काढता, दोन्ही कार्डवरून प्रत्येकी 40 हजार रुपये काढू शकतात. असे केल्याने त्यांच्या कार्डवर उधार घेतलेल्या रकमेचे प्रमाण 40 टक्केच राहील.


बोरोइंग अ‍ॅबिलिटी कशी सुधाराल
1. कर्जदाती बँक किंवा क्रेडिट कार्ड कंपनीकडे आपल्या खात्याच्या वास्तव स्टेटमेंटची मागणी करा. जेवढे उधार घेतले आहे आणि जे उधार घ्यायचे आहे त्याची स्पष्ट माहिती मिळेल.
2. एकाच उत्पादनावर जास्त कर्जाचा बोजा पडणार नाही याची काळजी घ्या. उदाहरणार्थ पर्सनल लोन, होम लोन आदी. क्रेडिट कार्ड तसेच पर्सनल लोन असुरक्षित असतात. यासाठी घेण्यात आलेले जास्त कर्ज क्रेडिट स्कोअरवर परिणामकारक ठरते.
3. नव्या कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी जुने कर्ज फेडा. त्यामुळे खात्यातील देणे कलमात घट येईल. त्याशिवाय कर्जाचा भार कमी होण्यास मदत होईल. एकाच वेळी अनेक कर्ज घेऊ नका. यामुळे सिबिल स्कोअरवर परिणाम होतो.
उधारी किंवा कर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे उपाय उपयुक्त ठरतात. क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी प्रयत्न करा. एकूण उत्पन्नापैकी 30 ते 40 टक्क्यांपेक्षा जास्त कर्ज घेणे टाळा. दैनंदिन जीवनात या बाबी काही जणांना गौण वाटतील, मात्र होम लोन किंवा इतर कर्ज घेताना या छोट्या बाबींचे महत्त्व लक्षात येईल. आपला ईएमआय चुकणार नाही किंवा त्यास फार विलंब होणार नाही याची नेहमी काळजी घ्या.


लेखक bankbazaar.comचे सीईओ आहेत.