आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला काळ्या पैशाच्या तपासात मॉरिशस करणार मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्ट लुई/ नवी दिल्ली - काळ्या पैशाचा तपास करणा-या एसआयटीला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मॉरिशसने दिले असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. स्वराज यांनी नुकतीच मॉरिशसचे परराष्ट्रमंत्री अर्विन वुलेल यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी हे आश्वासन दिल्याचे स्वराज यांनी सांगितले. स्वराज दोन दिवसांच्या मॉरिशस दौ-यावर होत्या.
भारतातील बहुतांश विदेशी गुंतवणूक मॉरिशसमार्गे होते. मग तो एफडीआय असो की एफआयआय. मात्र, मॉरिशस मार्गाचा वापर काळा पैसा पांढरा करण्यासाठी होत असल्याचा आरोप अलीकडच्या काळात होत आहे.

सेबीच्या मते वर्ष २०१३ च्या अखेरपर्यंत मॉरिशसमध्ये नोंदणी असलेल्या विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून (एफआयआय) भारतात ३.३१ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली. काळ्या पैशासंदर्भात झालेल्या आरोपानंतर मॉरिशसची पत खराब झाली आहे. भारताने ऑगस्ट २०१३ ते ऑगस्ट २०१४ या काळात ९७ प्रकरणांत माहिती मागवली होती. मॉरिशसच्या मते यातील ८५ टक्के प्रकरणांचा निकाल लागला आहे.

मॉरिशसच्या कंपन्यांना गुंतवणुकीचे आमंत्रण
* स्वराज यांनी दुहेरी कर निर्धारण कराराबाबत (डीटीए) मॉरिशसला असलेल्या शंकांचे निरसन करतानाच तेथील कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले आहे. डीटीएबाबत मॉरिशसच्या हिताला बाधा पोहोचणार नाही याची काळजी घेण्याचे आश्वासन स्वराज यांनी मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र रामगुलाम यांना दिले. डीटीएबाबत दोन्ही देशांत काही मतभेद आहेत त्यामुळे हा करार बराच काळ प्रलंबित आहे.
* स्वराज यांनी या वेळी भारत-मॉरिशस व्यापार बैठकीत मार्गदर्शन केले. त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मेक इन इंडियाचा उल्लेख करत भारतात आगामी काळात निर्माण होणा-या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले. स्वराज म्हणाल्या, भारत आणि मॉरिशस यांच्यातील संबंध केवळ द्विपक्षीय करारापुरतेच मर्यादित नाहीत. भारताने आफ्रिकी द्वीपकल्पाबरोबर आर्थिक संबंध वाढीसाठी एक व्यापक धोरण तयार केले आहे.

मला वाटते, आपल्यापैकी ब-याच जणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या मेक इन इंडिया मोहिमेचे प्रसारण पाहिले असेलच. सरकारकडून टाकण्यात आलेल्या नव्या पावलांचा लाभ उठवण्याचे आवाहन मी करते. भारतात निर्माण होणा-या संधीचा लाभ उचलण्यासाठी आपण विलंब करू नये. यात तुमच्यासाठी एक स्थान बनवा आणि भारतीय प्रगतीचे साक्षीदार बना.
सुषमा स्वराज, परराष्ट्रमंत्री.