आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Medical Treatment Cover Everyone, FDI In Medical Equipment Sector

वैद्यकीय उपचार येणार आवाक्यात, वैद्यकीय उपकरण क्षेत्रात एफडीआय लागू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - केंद्र सरकारने वैद्यकीय उपकरणांमध्ये १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) मंजुरी दिली असून त्याची अंमलबजावणी २१ जानेवारीपासून होत आहे. त्यामुळे परदेशातील कंपन्यांना आता भारतात उपकरण प्रकल्प उभारता येणार आहे. यामुळे वैद्यकीय उपकरण निर्मिती क्षेत्रातील स्पर्धा वाढून त्याची परिणती किफायतशीर उपचारांमध्ये होणार आहे. उपचार खर्च २० ते ३० टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अर्थात हा परिणाम प्रत्यक्षात दिसण्यासाठी दोन वर्षे लागतील.


या क्षेत्रात आतापर्यंत ५१ टक्के एफडीआयला परवानगी होती. भारतात सध्या एकही कंपनी वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन करीत नाही. त्यासाठी ७५ टक्के आयातीवर अवलंबून रहावे लागते. या क्षेत्रातील पेटंटचे प्रमाणही कमी आहे. सध्या यात चीन ही जगातील दुस -या क्रमांकाची बाजारपेठ असून वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन तेथे होते. डायग्नोस्टिकवर सध्या मालवाहतूक वगळता २९ टक्के आयातशुल्क आहे. मालवाहतूक खर्च गृहित धरल्यास एकूण आयात शुल्क ३५ टक्क्यांवर जाते. जर आयात शुल्क कमी केले किंवा ते काढून टाकले तर नफ्याचे प्रमाण जवळ जवळ ३० ते ३५ टक्क्यांनी वाढते. ‘मेक इन इंडिया’ मोहीमेंतर्गत पंतप्रधानांनी कच्च्या मालावरील आयात शुल्क शून्यावर आणण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तसे झाल्यास उत्पादकांचे नफ्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढणार आहे. उत्पादकांनी ही नफावाढ सामान्यांपर्यंत पोहचवली तर येणा -या काही वर्षात रुग्णांना किफायतशीर किंमतीत वैद्यकीय उपकरणांच्या सेवेचा लाभ घेता येऊ शकेल. मागील आठवड्यात शंभर टक्के एफडीआयची घोषणा झाल्यानंतर असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाईस इंडस्ट्रीजने या संस्थेने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. विद्यमान वैद्यकीय प्रकल्पांमध्ये जर ही अमलबजावणी झाल्यास देशातील स्थानिक वैद्यकीय उपकरण उत्पादक कंपन्यांचे अस्तित्व धोक्यात येऊन या कंपन्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे लक्ष्य ठरतील अशी भीती व्यक्त केली होती.

वैद्यकीय उपचारावरील ढोबळ खर्चाचा हिशोब :
जर रूग्ण १०० रुपये भरत असेल तर त्यातील ७० ते ७५ टक्के खर्च हॉस्पिटलायझेशन ट्रिटमेंटवर होतो, २५ % खर्च निदान आणि औषधांवर होतो. (कॅन्सर, हेपिटायटीस वगळता, कारण त्यावर खर्च जास्त)

एक्स्पर्ट व्ह्यु ..
देशातील वैद्यकीय उपकरण निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. रुग्णालयांची वाढती संख्या, स्वस्तातील औषधे, स्वस्त वैद्यकीय उपकरण या गोष्टींचा ‘मेक इन इंडिया’तील सहभाग सक्रियपणे वाढून आरोग्य गरजांसाठी पसंतीचे सोल्युशन प्रोव्हायडर बनता येऊ शकेल.
- आदिती कारे-पणंदीकर, एमडी, इंडोको रेमिडिज


सध्या ७५ टक्के उपकरणांची आयात होते, परकीय चलन मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. गुंतवणुकीबरोबरच रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होण्यास यामुळे मदत होऊ शकेल.
- डॉ. अजय फडके, कन्सल्टींग पॅथॉलॉजिस्ट, डॉ. पडके पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीज अँड इन्फर्टिलीटी सेंटर


रुग्णांसाठी उपलब्ध होऊ शकत नसलेली अनेक गुंतागुंतीची आणि महत्वाची उपकरणे बाजारात येऊ शकतील. चांगल्या दर्जाची औषधे उपलब्ध झाल्यामुळे उपचाराचा खर्च जवळपास २०० टक्क्यांनी कमी होईल वैद्यकीय उपकरणांची निर्मिती भारतातच झाल्यामुळे ती स्वस्त दरात उपलब्ध होतील. वैद्यकीय सेवाही स्वस्त होईल.
- डॉ. पवन कुमार, प्रख्यात हृदय शल्यविशारद, लीलावती रुग्णालय, मुंबई


बहुराष्ट्रीय कंपन्याना भारतात प्रकल्पासाठी जागा ताब्यात घेणे व उभारणीसाठी कालावधी लागणार आहे. त्यामुळे साधारणपणे दोन वर्षानंतर त्याचा फायदा रुग्णांना मिळू शकतो. वैद्यकीय उपकरणे आणि रसायनांच्या आयातीवर सध्या ३० टक्के कर द्यावा लागतो. ज्ञानाचे आदान प्रदान होईल. स्थानिक पातळीवर संशोधन - विकासाला गती मिळेल. वैद्यकीय उपकरणे २० ते ३० टक्के स्वस्त होऊ शकतात
- अमीरा शहा, एमडी व सीईओ, मेट्रोपॉलिस हेल्थकेअर


फायदे १००% ‘एफडीआय’चे
* वैद्यकीय उपकरणांच्या किमती कमी होणार
* नव्याच्या आगमनामुळे विद्यमान तंत्रज्ञान स्वस्त
* उपकरणांची आयात घटून विदेशी चलन बचत
* देशांतर्गत उत्पादनामुळे ग्राहकांना फायदा
* उत्पादन वाढून गुणात्मक, दर्जात्मक वाढ


ही उपकरणे होऊ शकतात स्वस्त
स्टेंट, ड्रग्ज इल्युटेड स्टेंट, नी रिप्लेसमेंट, हिट रिप्लेसमेंटसाठी लागणारे कृत्रिम सांधे, एमआरआय, सीटी स्कॅन, लॅप्रोस्कोपी, कॅथेडर, आयव्हीडी मशीन, वाउंड क्लोजर पॅड (हृदयाचे कामकाज सुरू करताना देण्यात येणा-या शॉकच्या वेळी वापरण्यात येणारे उपकरण), अॅन्जियोग्राफी, अॅन्जियोप्लास्टीसह अन्य उपकरणे.


42,0000 कोटी रु, (७ अब्ज डॉलर) वैद्यकीय उपकरणांची विक्री
क्षेत्राची वाढ : वार्षिक १२ ते १५ टक्क्यांपर्यंत