चंदिगड - लक्झरी कार निर्माती मर्सिडीझ आता भारतात दुपटीने कार निर्मिती करणार आहे. कंपनीच्या पुण्यानजीकच्या चाकण येथील निर्मिती प्रकल्पात सध्या वर्षाकाठी 10 हजार कारची निर्मिती होते. कंपनीने ही क्षमता वाढवून वर्षाकाठी 20 हजार कार निर्मितीची योजना आखली आहे. यासाठी मर्सिडीझ भारतात 250 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे भारतात मर्सिडीझची गुंतवणूक 850 कोटींहून जास्त होईल, मर्सिडीझ बेंझ इंडियाचे एमडी आणि सीईओ एबरहार्ड केर्न यांनी ही माहिती दिली. पंजाबमधील सर्वात मोठे वितरक पंजाब मोटर्सच्या उद्घाटनानिमित्त ते येथे आले होते.
ते म्हणाले, भारतीय बाजापेठेतील आपली प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी मर्सिडीझ यंदा 10 नव्या कार सादर करणार आहे. यातील चार मॉडेल सादर करण्यात आले असून एमएल 63 एएमजी ही नवी एसयूव्ही 15 मे रोजी सादर होणार आहे. यंदा कंपनी नवीन 11 वितरक नेमणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोहाली येथे वितरणाला प्रारंभ झाला. सध्या कंपनीचे देशभरातील 36 शहरांत 64 वितरक आहेत. भारतीय ग्राहकांसाठी मर्सिडीझ-बेंझ वित्तीय साहाय्य, विमा आणि लीजिंग आदी सुविधाही देत आहे. केर्न यांनी सांगितले, 50 टक्क्यांहून जास्त कारला वित्तीय साहाय्य आणि विमा आदी देण्यात येत आहेत, तर लीजिंगमध्येही वाढ होत आहे. अनेक कंपन्या, कॉर्पोरेट कार्यालये लीजवर कार घेत आहेत. असे असले तरी खरेदीवरच ग्राहकांचा भर आहे.
मागणीत वाढ
चाकण येथील प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात येणार आहे. तेथे सध्या वर्षाकाठी 10 हजार कारची निर्मिती होते, आगामी काळात ही क्षमता 20 हजारांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. मागणीत वाढ होत आहे.
एबरहार्ड केर्न, एमडी व सीईओ, मर्सिडीझ- बेंझ इंडिया