आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Micromax Usurps Samsung In Indian Smartphone Market

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मार्टफोन बाजार : सॅमसंगला मागे सारून मायक्रोमॅक्स अव्वल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील स्मार्टफोनच्या बाजारपेठेत आता मायक्रोमॅक्स क्रमांक एकची कंपनी बनली आहे. कोरियाच्या सॅमसंग या कंपनीला तिने मागे सारले आहे. आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था कॅनालिसच्या मते, ऑक्टोबर ते डिसेंबर २०१४ या तिमाहीत मायक्रोमॅक्सने २२ टक्के बाजारपेठ काबीज केली आहे. याच काळात सॅमसंगचा हिस्सा २० टक्के राहिला. कार्बन तिसर्‍या, लावा चौथा क्रमांकावर आहेत.

कॅनालिसच्या अहवालानुसार, मायक्रोमॅक्सने ९ हजार ते १२ हजार रुपये किमतीचे किफायतशीर स्मार्टफोन अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त आणि उत्तम फीचर्ससह सादर केले. ग्रामीण भागातील ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन स्थानिक भाषेतील हँडसेट सादर केले. मायक्रोमॅक्सच्या मागणीत त्यामुळे मोठी वाढ झाली आहे.

सॅमसंगच्या साम्राज्याला घरघर :
सॅमसंगला इतर बाजारपेठांतही कडवे आव्हान मिळत आहे. महागड्या फोनबाबत त्यांना अ‍ॅपलशी स्पर्धा करावी लागत आहे. मध्यम श्रेणीत चीनच्या शिओमीची विक्री सातत्याने वाढत आहे. मोबाइल विक्रीबाबत आयडीसीची आकडेवारी खात्रीची मानली जाते. आयडीसीने देशात जुलै-सप्टेंबर काळात सॅमसंगचा बाजार हिस्सा २४ टक्के दर्शवला होता. डिसेंबर तिमाहीची आकडेवारी आणखी जाहीर झालेली नाही.

डिसेंबर तिमाहीचे चित्र
२.१६ कोटी स्मार्टफोनची विक्री देशात ऑक्टोबर-डिसेंबर या काळात
९०% वाढ या तिमाहीत स्मार्टफोनच्या विक्रीत
४१% विक्री ६ ते १२ हजार रुपयांच्या हँडसेटची
२३% विक्री ६ हजारांहून कमी किमतीच्या हँडसेटची

चुकीची आकडेवारी : सॅमसंग
सॅमसंग या दक्षिण कोरियाच्या कंपनीने कॅनालिसने सादर केलेली आकडेवारी चुकीची असल्याचे म्हटले आहे. सॅमसंगच्या मते, ३१ डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनी ३४.३ टक्के हिस्सेदारीसह सर्वात अव्वल आहे. सॅमसंगने जीएफके डाटाचा हवाला देत हा दावा केला आहे. त्यानुसार वर्ष २०१४ मध्ये सॅमसंगचा या बाजारपेठेतील हिस्सा ३५.७ टक्के राहिला. ही हिस्सेदारी दुसर्‍या क्रमांकाच्या (मायक्रोमॅक्स) कंपनीपेक्षा दुप्पट आहे. सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष (विपणन ) असीम वारसी यांनी सांगितले, कॅनालिसच्या आकडेवारीबाबत शंकेला वाव आहे. ही आकडेवारी शिपमेंटवर (कंपनीकडून वितरकांना पाठवण्यात आलेले हँडसेट) आधारित आहे, तर जीएफकेची आकडेवारी वास्तविक विक्रीवर आधारित आहे.