आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - अँड्रॉइड आणि आयफोनबरोबरच्या स्पर्धेत मागे पडलेल्या मायक्रोसॉफ्टने बाजारातील आपला हिस्सा वाढवण्याच्या दृष्टीने आता पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट कंपनी आता नोकियाबरोबरच इतर कंपन्यांनादेखील त्यांच्या विंडोज कार्यप्रणालीवर काम करणा-या मोबाइल उत्पादनासाठी प्रोत्साहन देणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत लावा आणि कार्बन या कंपन्यांना मायक्रोसॉफ्टने विंडोज कार्यप्रणालीसाठी परवाना शुल्क न आकारण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे लवकरच विंडोज मोबाइलची बाजारपेठ विस्तारणार असून नोकियाच्या बरोबरीने इतर कंपन्यांचे विंडोज फोनदेखील ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. बार्सिलोना येथे नुकत्याच पार पडलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये मायक्रोसॉफ्टने या योजनेचे संकेत दिले होते.
मागील वर्षापासून नोकियाच्या बरोबरीनेच इतर कंपन्यांनीदेखील विंडोज आधारित फोन बाजारात आणावे, यासाठी मायक्रोसॉफ्ट प्रयत्नशील होते. मात्र, या कार्यप्रणालीसाठी मायक्रोसॉफ्टकडून आकारले जाणारे परवाना शुल्क या प्रक्रियेतील मुख्य अडसर ठरत होते. नोकिया कंपनीलादेखील ल्युमिया आवृत्तीतील प्रत्येक फोनसाठी अंदाजे 20 ते 30 डॉलर शुल्क आकारण्यात येत होते. आता हे शुल्क न आकारण्याचा प्रस्तावच मायक्रोसॉफ्टकडून देण्यात आल्याने सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या विंडोज फोनची किंमतदेखील कमी होऊ शकेल. भारतीय कंपन्यांसह काही विदेशी कंपन्यांनादेखील मायक्रोसॉफ्टतर्फे मोफत विंडोज कार्यप्रणाली वापरण्याची परवानगी दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.