आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Milind Kambale Article About Industry And Development, Divya Marathi

नोक‍रीच्‍या मानसिकतेला उद्योगाचा डोस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्योग, व्यवसायासाठी महाराष्ट्रात अगोदरपासूनच पोषक वातावरण होते हे लक्षात घेतले पाहिजे. दांडेकर, किलरेस्कर, गरवारे आणि अशा अनेक मराठी औद्योगिक घराण्यांनी व्यवसाय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. आपण जर 20 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीचा मागोवा घेतला तर असे दिसून येते की आपली अर्थव्यवस्था लायसन्स राजमध्ये अडकून पडल्याने संधी फार कमी होत्या. त्यामुळे स्वाभाविकपणे मराठी माणसाचा उद्योजकतेकडे वळण्याचा कल फारसा नव्हता. विशेष करून एफएमसीजी क्षेत्रात आपली मराठी मंडळी फारशी नव्हती. फक्त वर उल्लेख केलेली काही औद्योगिक कुटुंब मात्र मोठय़ा उद्योगांमध्ये स्थिरावलेली होती.
गेल्या 20 वर्षांमधील राज्यातल्या उद्योग विश्वाकडे वळून बघितले तर एक गोष्ट लक्षात येईल की, 1991 मध्ये केंद्र सरकारने खुले आर्थिक धोरण स्वीकारले आणि त्याचवेळी जखडून पडलेल्या आपल्या अर्थव्यवस्थेला मोकळा श्वास घेता आला. तेव्हापासून राज्याच्या आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावण्यास सुरुवात झाली. कशाला उद्योग व्यवसायाच्या भानगडीत पडायचे, त्यापेक्षा आपली नोकरी केलेली बरी अशीही एकेकाळी मानसिकता होती. या मानसिकतेतून मराठी माणूस पूर्णपणे बाहेर पडला आहे असे आता नक्की म्हणता येईल. नोकरीकडून व्यवसायाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी 1990 हे वर्ष सर्वाधिक कलाटणी देणारे ठरले आहे. खुल्या आर्थिक धोरणाचा स्वीकार केल्यानंतर राज्यातील उत्पादन विकास आणि उद्योगाचा वेग वाढत गेला. हा एक मोठा बुस्टर डोस म्हणावा लागेल. जागतिकीकरणानंर स्पर्धात्मक झालेल्या बाजारपेठेत आऊटसोर्सिंगचे महत्त्व मोठय़ा प्रमाणावर वाढले. कारण या आऊटसोर्सिंगच्या निमित्ताने एक मोठा उद्योग भारतात आला. पूर्वीपासून असलेले कंपन्यांचे पुरवठादार, वितरक आजही आहेत. पण या नव्या उद्योगामुळे विविध प्रकारच्या संधींचा आवाका वाढून नवीन मराठी युवकही याकडे वळू लागली आणि बघता बघता त्यांनी माहिती तंत्रज्ञान, उत्पादनापासून ते अगदी सेवा क्षेत्रापर्यंत उंच भरारी घेतली.

बीबीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड या तरुणाने सेवा क्षेत्रात मोठे नाव तर कमावलेच पण जवळपास 25 ते 30 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. हा सर्व अर्थव्यवस्थेचा परिणाम आहे. उद्योग क्षेत्रात स्थिरावलेले औरंगाबादमधील राम भोगले कुटुंब अशी अनेक उदाहरणे देता येऊ शकतील. गुजरातमध्ये उद्योग क्षेत्रासाठी नरेंद्र मोदी यांनी केलेys काम सगळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे आता ते पंतप्रधान झाल्यावरही त्यांचे उद्योग क्षेत्रांसाठी अनुकूल संबंध राहतील याची खात्री लोकांना पटली आहे. राज्याचा विचार केल्यास भविष्यात कृषी क्षेत्र, विशेषकरून अन्न आणि अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठय़ा प्रमाणावर संधी असून त्याच सर्वात जास्त फायदा मराठी तरुणांना मिळणार आहे. गेल्या एकवीस वर्षांत नोकरीकडून व्यवसायाकडे वळलेल्या मराठी उद्योजकांनी घोडदौड करून यशाची शिखरे काबीज केली. येणारा काळही नवी शिखरे पादाक्रांत करण्यासाठी यशदायी ठरले यात शंका नाही.

(अध्यक्ष, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉर्मस अँड इंडस्ट्रीज)