आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mobile Call Rate News In Marathi, Spectrum Sharing

मोबाइल कॉल स्वस्त होणार; टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम शेअरिंगची सवलत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दूरसंचार नियामक ट्रायने स्पेक्ट्रम शेअरिंगबाबतच्या शिफारशी जाहीर केल्या आहेत. लिलाव झालेल्या तसेच लिलाव न झालेले स्पेक्ट्रम एकमेकांत वाटून घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. या शिफारशीनुसार टेलिकॉम कंपन्यांना सर्व प्रकारचे स्पेक्ट्रम शेअर करता येतील. यामुळे सर्व टेलिकॉम कंपन्यांना फायदा होणार आहे. शिफारशी लागू झाल्यास एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांना लाभ होईल. यामुळे विविध मोबाइल सेवांवर होणारा खर्च कमी होऊन कॉल दर स्वस्त होण्याची शक्यता आहे.

या घोषणेनंतर शेअर बाजारात टेलिकॉम कंपन्यांच्या समभागांत चांगली तेजी दिसून आली. शिफारशी लागू झाल्यास कंपन्यांचा स्पेक्ट्रमसाठी होणारा खर्च कमी होईल, तर ग्राहकांना स्वस्त दरात चांगल्या दर्जाची सेवा मिळेल. असे असले तरी यामुळे स्पेक्ट्रमच्या लिलावातून होणार्‍या सरकारच्या मोठ्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

ट्रायच्या शिफारशी
> ट्रायने शेअरिंगवर 0.5 टक्के स्पेक्ट्रम वापर शुल्क आकारण्याचे सुचवले आहे.
> स्पेक्ट्रम शेअर करणार्‍या दोन्ही परवानाधारक कंपन्यांना प्रशासकीय कारणास्तव 50 हजार रुपये प्रक्रिया शुल्क द्यावे लागेल, जे परत करण्यात येणार नाहीत.
> नव्या शिफारशीनुसार एका बँडसाठी स्पेक्ट्रम धारण करण्याची मर्यादा 50 टक्के आणि पूर्ण मंडळासाठी (सर्कल) ही मर्यादा 25 टक्के राहील. लिलाव झालेल्या किंवा लिलाव न झालेल्या स्पेक्ट्रमचे आपसात वाटप करता येईल.
> स्पेक्ट्रमला लीज देता येणार नाही. प्रारंभी केवळ 5 वर्षांसाठी स्पेक्ट्रम शेअर करण्यास मुभा.

शिफारशीचे परिणाम
> ट्रायच्या शिफारशीमुळे बड्या कंपन्यांना स्पेक्ट्रमचा तुटवडा जाणवणार नाही.
> कंपन्यांना लिलावाद्वारे महागडे स्पेक्ट्रम खरेदीची गरज भासणार नाही.
> कंपन्यांसाठी स्पेक्ट्रम स्वस्त होण्याची अपेक्षा
> व्होडाफोन, एअरटेल आणि आयडिया कंपनीला फायदा
> कंपन्यांसाठी स्पेक्ट्रम स्वस्त झाल्याने मोबाइल कॉल दर स्वस्त होण्याची शक्यता असून ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळणार आहे.