आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई - एमएज्युकेशन, एमएंटरटेनमेंट, एमफायनान्स, एमहेल्थ म्हणजे काय हे मोबाइलधारकांना सांगण्याची वेगळी गरज नाही. कारण ‘एम’पासून सुरू होणा-या नानाविध सेवा आता सर्वांनाच परिचयाच्या झाल्या आहेत. किंबहुना प्रत्येक मोबाइलधारक यापैकी कोणत्या ना कोणत्या तरी सेवांचा लाभ घेत आहे. या सेवांची नव्हे तर मूल्याधिष्ठित सेवांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर विस्तारली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी विप्रोने केलेल्या एका अहवालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत मूल्याधिष्ठित सेवांची बाजारपेठ दुपटीने वाढून 2015 पर्यंत 9.5 अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
मोबाइल हॅँडसेट्सचे जाळे जितके विस्तारत आहे, तितक्याच प्रमाणात मोबाइलवरून दिल्या जाणा-या विविध मूल्याधिष्ठित सेवांचे अर्थात मोबाइल व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेसचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गेल्या वर्षात 4.9 अब्ज डॉलरची उलाढाल झालेली ही बाजारपेठ 2012 ते 2015 या कालावधीत संकलित 25 टक्के वार्षिक वाढीची नोंद करून 9.5 अब्ज डॉलरपर्यंत जाण्याचा अंदाज मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया आणि विप्रो टेक्नॉलॉजीज यांनी संयुक्तरीत्या तयार केलेल्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
मोबाइल व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसच्या माध्यमातून या बाजारपेठेत नवीन क्रांती होणे अपेक्षित असून नवनवीन मोबाइल संच आणि मोबाइल नेटवर्कच्या क्षमतांचा होत असलेला विस्तार यामुळे या बाजारपेठेच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध झाल्या असल्याचे मत विप्रो टेक्नॉलॉजीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष आयन मुखर्जी यांनी व्यक्त केले. एकीकडे मूल्याधिष्ठित सेवांच्या बाजारपेठेत लक्षणीय वाढ होत असली तरी दुस-या बाजूला मूळ माहितीपूर्ण मोबाइल सेवांनी (बेसिक इन्फर्मेशनल मोबाइल सर्व्हिस) मात्र उतरणीचा कल दाखवण्यास सुरुवात केली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ट्यूटर आॅन कॉल, व्होकेशन ट्रेनिंग, इंग्रजी भाषा शिकण्याची सेवा, स्पर्धात्मक परीक्षांची तयारी या सर्व गोष्टींचे शिक्षण मोबाइलवर अतिशय सुलभ आणि संवादात्मक पद्धतीने उपलब्ध झाल्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबरोबरच तो देशाच्या कानाकोप-यात पोहोचवण्याच्या दृष्टीने मोबाइल शिक्षण अर्थात एमएज्युकेशन महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
अनेक सेवांत मोबाइलचा हातभार
मोबाइल हेल्थ या आणखी एका सेवेमुळे रिमोट डायग्नोस्टिक, गंभीर विकारांचे व्यवस्थापन आदींच्या माध्यमातून विविध आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होण्याबरोबरच त्या माफक खर्चात उपलब्ध होत आहेत. देशातील लोकसंख्येच्या जवळपास 40 टक्के नागरिकांना बॅँक सुविधा उपलब्ध नसली तरी अशा लोकांपर्यंत वित्तीय सेवा पुरवण्यातही मोबाइल फोनची सर्वात जास्त मदत होत आहे. मोबाइल वॉलेट सेवा, रक्कम हस्तांतर सुविधा, व्यवसाय प्रतिनिधी संकल्पनेवर आधारित सेवांच्या माध्यमातून मोबाइल फायनान्सचा विस्तार होत असून त्यामुळेदेखील मोबाइलच्या माध्यमातून देण्यात येत असलेल्या विविध मूल्याधिष्ठित सेवांच्या महसुलात मोठी भर पडत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.