आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थव्यवस्था विकासासाठी अत्याधुनिक विमानतळ हवेतच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेल्वे आणि महामार्ग यांच्याबरोबरीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विमानसेवेकडे आणि विमानतळ बांधणीकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष झाले. जागतिकीकरण सुरू झाल्यानंतरही या क्षेत्राकडे लक्ष जायला 10 वर्षे जावी लागली. नव्या सहस्रकात विमानसेवेत खासगी उद्योगांना मुभा मिळाल्यामुळे विमानसेवेला अचानक महत्त्व आले आणि अनेक कंपन्या या स्पर्धेमध्ये उतरल्या. उच्चभ्रूंची सेवा आणि सर्वसामान्यांची सेवा असेही याचे भाग पडले. दोन्ही सेवांना उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच आता परदेशी कंपन्यांसाठीही हे क्षेत्र खुले होऊन तिथेही चढाओढ सुरू आहे.

देशात फक्त 456 विमानतळ, जवळजवळ 33 टक्के विमानतळ अद्याप वापरात नाहीत
अवघ्या 10-12 वर्षांत विमानसेवेला असे महत्त्व आले असले तरी या क्षेत्राच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पुरेसे विमानतळ आपल्याकडे आहेत का, हा खरा प्रश्न आहे. आज देशात फक्त 456 विमानतळ आहेत. पण त्यापैकी जवळजवळ 33 टक्के विमानतळ अद्याप वापरात आलेले नाहीत. अर्थात हे विमानतळांचे आकडेही आपल्याला आश्चर्यचकित करणारेच आहेत. पण इतर छोट्या देशांशी तुलना केली तर आपण नेमके कुठे आहोत हे लक्षात येईल. ब्रिटन हा तर मुंबई जिल्ह्याएवढा लहानसा देश. तिथे तब्बल 462 विमानतळ आहेत. बससेवा चालावी तशी विमानसेवा चालते. आशियातले आपल्यासारखेच विकसनशील देश असणार्‍या इंडोनेशियात 676, पाकिस्तानात 151, तर थायलंडमध्ये 102 विमानतळ आहेत.

ब्राझीलसारख्या विकसनशील देशात 4105 विमानतळ
ब्राझीलसारखा विकसनशील देश अमेरिकेनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे. तिथे 4105 विमानतळ आहेत. ब्राझीलची प्रगती वेगाने होते आहे, त्याचे रहस्य या व्यापक व गतिमान विमानसेवेत आहे. वाचकांना प्रश्न पडेल की, विमानतळामुळे स्थानिक विभागाचा विकास कसा होऊ शकतो? त्याच्या महत्त्वाच्या उत्तरांकडे आपण जागरूकपणे लक्ष देणे आवश्यक आहे. विमान वाहतुकीवर 100 डॉलर खर्च होत असतील तर त्यातून 325 डॉलर उत्पन्न मिळते, असा आंतरराष्ट्रीय अंदाज आहे. या सर्वसाधारण अंदाजाला स्थानिक मुद्दे जोडता आले तर फायद्याचे प्रमाण कल्पनेबाहेर वाढू शकते. उदाहरणार्थ- महत्त्वाचे तीर्थक्षेत्र किंवा पर्यटनस्थळ विमानतळाजवळ असेल तर त्यामुळे स्थानिक विकासाला चालना मिळते. हिमालयाच्या कुशीतला लडाख आजवर दुर्लक्षित भाग होता. श्रीनगरला उतरून लडाखला जाणे जिकिरीचे होते. लेहला विमानतळ झाला आणि लडाखमध्ये केवळ पर्यटनच वाढले नाही तर अनेक राष्ट्रीय संस्था तिथे आल्या. स्थानिक महसूल वाढला. स्थानिकांना अनेक प्रकारचे रोजगार मिळाले. शिवाय तेथील उत्पादने आणि सेवा देशाच्या इतर भागात पोहोचू लागल्या. ईशान्य भागातील दुर्गम प्रदेशात विमानतळ झाल्यामुळे देशभरातल्या वस्तू तिथे पोहोचणे शक्य झाले.

विमानतळांच्या वेगवान बांधणीत अडचणी
मोठी अडचण सरकारच्या अत्यल्प मदतीची आहे. 12 व्या पंचवार्षिक योजनेत नव्या विमानतळासाठी व जुने कार्यान्वित करण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने 17 हजार 500 कोटी रुपये मागितले. त्यापैकी अर्थसंकल्पातून होणारी तरतूद फक्त 331 कोटी रु.आहे. 4 हजार 742 कोटी रुपये केंद्राकडून अनुदान मिळेल, तर एनईसीकडून 555 कोटींचे अनुदान मिळेल. याचा अर्थ 65 टक्के रक्कम प्राधिकरणाला स्वत: उभी करावी लागेल.

त्यातले 7 हजार 700 कोटी कर्जाऊ घेतले जातील. हे आकडे पाहिले म्हणजे विमानतळांची बांधणी मागे का पडते, हे लक्षात येईल. 2008 मध्ये सरकारने 33 नवीन ग्रीनफील्ड विमानतळ उभारण्यास परवानगी दिली होती. नवी मुंबईसह त्यापैकी एकही विमानतळ उभा राहिला नाही. पण पुदुचेरी, कोलकाता, चेन्नई, रायपूर, इंदूर, भुवनेश्वर या विमानतळांचे नूतनीकरण करून ते गेल्या वर्षभरात कार्यान्वित झाले आहेत. त्यासाठीच सुमारे 5 हजार कोटी खर्च झाले आहेत.
छोटी विमाने व विमानतळ वापरले तर फायदाच

उत्कृष्ट दर्जाच्या विमानतळ उभारणीला खूप मोठा भांडवली खर्च करावा लागतो हे खरेच, पण त्यापासून मिळणारे फायदे खूप महत्त्वाचे आहेत. जमीन संपादन अधिक सोपे केले, टोलेजंग विमानांच्या मागे न लागता छोटी विमाने वापरली आणि विमानतळ व रस्ते यांचे मालवाहतुकीच्या दृष्टीने योग्य नियोजन केले, तर सर्वच विमानतळ फायद्यात आणता येतील आणि त्यामुळे विकासाला मोठी चालना मिळेल.

(लेखक व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष आहेत.)