रोजगाराच्या संधींत सात / रोजगाराच्या संधींत सात टक्क्यांनी वाढ

वृत्तसंस्था

Mar 26,2014 03:00:00 AM IST

नवी दिल्ली - फेब्रुवारीमध्ये सलग पाचव्या महिन्यात देशातील रोजगाराच्या संधीत वाढ झाल्याचे एका अहवालात स्पष्ट झाले. मॉन्स्टर डॉट कॉम या ऑनलाइन नोकरी पोर्टलतर्फे करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात फेब्रुवारीत रोजगाराच्या संधी 7 टक्क्यांनी वाढल्याचे आढळून आले.

मॉन्स्टर डॉट कॉमतर्फे महिन्याला रोजगार निर्देशांक अहवाल सादर केला जातो. फेब्रुवारीच्या रोजगार निर्देशांकात 10 अंकांनी वाढ होऊन (7.04 टक्के) तो 152 वर पोहोचला आहे. जानेवारीत हा निर्देशांक 142 होता. रोजगाराविषयी कर्मचारी जास्त आशावादी असल्याचे यावरून दिसून आले आहे. ऑक्टोबर 2013 पासून रोजगार निर्देशांकात सातत्याने वाढ दिसून आली आहे. वार्षिक तुलनेतही रोजगार निर्देशांकाने 14 टक्के वाढ नोंदवली आहे. फेब्रुवारी 2013 मध्ये हा निर्देशांक 133 होता, यंदा तो 152 आहे.

मॉन्स्टर डॉट कॉमचे दक्षिण तसेच आग्नेय आशिया व भारतातील व्यवस्थापकीय संचालक संजय मोदी यांनी सांगितले, वार्षिक तुलनेत मॉन्स्टर रोजगार निर्देशांक यंदा सातत्याने उंचीचा आलेख दर्शवत आहे. रोजगाराच्या संधीबाबत 2013 हे वर्ष निराशाजनक ठरले, मात्र 2014 मध्ये खूपच आशादायी चित्र आहे. यंदा सर्वाधिक रोजगाराच्या संधी निर्मिती आणि उत्पादन क्षेत्रात असून त्याखालोखाल आयटी, बँकिंग, आरोग्यसेवा या क्षेत्रात संधी आहेत.

वेतनवाढ 10 टक्के
अलीकडील काळात झालेल्या काही सर्वेक्षणांनुसार दुसर्‍या तिमाहीत रोजगार निर्मितीत मोठ्या प्रमाणात वाढीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. 2014 मध्ये सरासरी वेतनवाढ 10 टक्के राहील, असे अहवाल सांगतात.

कोणत्या क्षेत्रात आहेत संधी
मॉन्स्टर रोजगार निर्देशांकानुसार वार्षिक तुलनेत 27 पैकी 17 औद्योगिक क्षेत्रांत रोजगाराच्या संधीत वाढ दिसून आली. अहवालानुसार माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आघाडीवर आहे.

X
COMMENT