आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेवींच्या व्याजात सुसूत्रता येणार ; रिझर्व्ह बॅँक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - बॅँकांकडून मुदत ठेवींवर आकारण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या व्याजदरांबाबतचे नियम रिझर्व्ह बॅँकेने आता आणखी कडक केले आहेत. त्यानुसार आता एक कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या मुदत ठेवींवर वेगवेगळे व्याजदर लागू करतानाच अशा प्रकारच्या ठेवी मुदतीपूर्वी काढण्यास नकार देण्याची मुभादेखील बॅँकांना देण्यात आली आहे.

समान परिपक्वता कालावधी असलेल्या ठेवींवर बदलते व्याजदर आकारण्याची परवानगी बॅँकांना देण्यात आली असून ती रुपयाच्या चलनातल्या एक कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या मुदत ठेवींसाठी लागू असेल. एकाच परिक्वता कालावधीच्या एक कोटीपेक्षा कमी रकमेच्या मुदत ठेवींवरही तोच व्याजदर आकारण्यात येईल, असे रिझर्व्ह बॅँकेने म्हटले आहे. या नव्या बदलाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2013 पासून करण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बॅँकेच्या अध्यादेशात म्हटले आहे.
बँकांना मुभा
मोठ्या रकमेच्या ठेवी परिपक्वता कालावधीच्या अगोदर काढून घ्यायच्या झाल्यास त्यावरील व्याजाचे स्वरूप बॅँकांना स्वत:च ठरवण्याची मोकळीक असेल. व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबांसहित सर्व ठेवीदारांच्या एक कोटी रुपये आणि त्यापेक्षा जास्त रकमेच्या ठेवी (रुपयाच्या चलनातील) मुदतपूर्व काढण्याची परवानगी बँका त्यांच्या कार्यपद्धतीनुसार नाकारू शकतात.
त्याचप्रमाणे परिपक्वता कालावधी पूर्ण होण्याच्या अगोदर मुदत ठेवी काढताना त्यावरील व्याजाचे स्वरूप बँकांना स्वत:च ठरवण्याची मोकळीक बॅँकांना देण्यात आली असल्याचे रिझर्व्ह बॅँकेच्या अध्यादेशात म्हटले आहे.