आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा मोटार, ट्रक विक्रीचा वेग मंदावण्याची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पेट्रोलच्या वाढलेल्या किमती, महाग झालेली कर्जे याचा विपरीत परिणाम वाहन उद्योगाच्या मागणीवर झाला आहे. वाहनांची मागणी कमी झाल्यामुळे गेल्या वर्षातल्या 10 ते 12 टक्क्यांच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2013 मध्ये मोटारींच्या विक्रीमध्ये 9 ते 11 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटो मॅन्युफॅक्चरर्स’ (सियाम) या संस्थेने व्यक्त केला आहे.
मोटारींबरोबरच व्यावसायिक वाहनांची मागणीदेखील कमी झाली आहे. त्यामुळे या वाहनांच्या विक्रीमध्ये अगोदरच्या 9 ते 11 टक्क्यांच्या तुलनेत यंदा 6 ते 8 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाजही ‘सियाम’ने व्यक्त केला आहे. परंतु दुचाकी विक्रीतील वाढीच्या अंदाजात मात्र कोणताही बदल न करता तो 11 ते 13 टक्के कायम ठेवला आहे. पेट्रोल दरवाढ, व्याजाचे फुगलेले दर आणि त्यातच अर्थसंकल्पात अबकारी शुल्कात झालेली वाढ याचा एकत्रित परिणाम म्हणून वाहन विक्रीच्या वेगाला करकचून ब्रेक लागला आहे.
पेट्रोल महाग झाल्याने आता मोटारप्रेमींनी डिझेल वाहनांना पसंती दिली आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत मारुती सुझुकीची स्विफ्ट, डिझायर सेडन, एट्रिगा या डिझेल मोटारींची विक्री चांगली वाढली आहे. व्यावसायिक वाहन खरेदीदारांना महागलेल्या कर्जांबरोबरच मंदावलेल्या आर्थिक प्रगतीचा फटका सहन करावा लागत आहे. बºयाच ट्रक कंपन्यांनी याच कारणासाठी आपला खरेदीचा विचार लांबणीवर टाकल्याने मध्यम आणि अवजड ट्रक्सची विक्री वाटचाल कूर्मगतीने सुरू आहे. जूनअखेर संपलेल्या कालावधीत देशातील मोटारींच्या विक्रीत 8.28 टक्क्यांनी वाढ होऊन ती आधीच्या वर्षातल्या 1 लाख 43 हजार 851 वाहनांवरून यंदा 1 लाख 55 हजार 763 मोटारींवर गेली असल्याचे सियामने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे. दुचाकींच्या एकूण विक्रीत 9.2 टक्क्यांनी वाढ होऊन ती 10,71,161 वरून 11, 69,733 दुचाकींवर गेली. विविध सर्व गटातील वाहनांच्या एकूण विक्रीमध्ये 9.05 टक्क्यांनी वाढ होऊन ती गेल्या वर्षातल्या जूनमधील 9.05 टक्क्यांनी वाढून 13,62,495 वरून 14,85,744 वाहनांवर गेली.