आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबानी बंधूमध्ये 12 हजार कोटींचा टॉवरबाज करार!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- तीन वर्षांपूर्वी फोर-जी सेवेचा परवाना घेऊनही मुकेश अंबानींना व्यावसायिक सेवा सुरू करण्याचा मुहूर्त मिळत नव्हता. परंतु आता अंबानी बंधूंमध्ये झालेल्या 12 हजार कोटी रुपयांच्या करारामुळे फोर-जी सेवेचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या मालकीच्या मोबाइल टॉवरचा उपयोग करून मुकेश अंबानी ‘रिलायन्स जिओ इन्फोकॉम’च्या व्यावसायिक सेवेला सुरुवात करणार आहेत.

‘स्पेक्ट्रम’च्या (2010) लिलावामध्ये अखिल भारतीय पातळीवरील फोर-जी सेवेचा परवाना मिळवणारी रिलायन्स जिओ इन्फोकॉम ही एकमेव कंपनी होती, परंतु अद्याप व्यावसायिक सेवा सुरू करण्याचा मुहूर्त मुकेश अंबानी यांना सापडला नव्हता. रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या माध्यमातून मुकेश अंबानी आपल्या अत्याधुनिक फोर-जी सेवेला प्रारंभ करण्याच्या तयारीत आहेत. व्यावसायिक सेवेचा प्रारंभ करण्यासाठी आरकॉमच्या राष्ट्रीयस्तरावरील जाळ्याच्या माध्यमातून रिलायन्स जिओ इन्फोकॉम ही कंपनी जमिनीवरील तसेच इमारतीवर उभारण्यात आलेल्या 45 हजार मोबाइल टॉवरचा उपयोग करणार असल्याचे या दोन्ही कंपन्यांनी स्वतंत्रपणे म्हटले आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम ही रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडकडून जवळपास 45 हजार मोबाइल मास्ट्स भाडेतत्त्वावर घेणार आहे. हा करार कायमस्वरूपी राहणार असून त्याचे मूल्य 12 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे दोन्ही रिलायन्स समूहांनी जाहीर केले.