आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरतला स्थलांतरासाठी काठियावाडी पटेल आग्रही, पालनपुरी जैन विरोधात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील हिरे व्यापारामध्ये प्रामुख्याने काठियावाडी पटेल आणि पालनपुरी जैन असे दोन वर्ग असून त्यांचा व्यवसायात प्रत्येकी 50 टक्के वाटा आहे. अलीकडच्या काळात पटेल व्यापार्‍यांचे हिरे व्यापारावर नियंत्रण वाढले असल्याचे बोलले जाते. या व्यापार्‍यांमध्ये व्यावसायिक स्पर्धा नसली तरी हिरे व्यापार सुरतला नेण्यासाठी पटेल गटाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या बहुतांश व्यापार्‍यांची विदेशातील अ‍ॅँटवर्प, बेल्जियम, जोहान्सबर्गसारख्या ठिकाणी स्वत:ची प्रतिष्ठाने आहेत.
सुरत पटेलांचे बलस्थान
सुरतमधील हिरे उत्पादन हे काठियावाडी पटेलांचे बलस्थान असून त्या बळावरच काठियावाडी पटेल यांच्या गटाने हिरे व्यापार गुजरातमध्ये नेण्याचा घाट घातला आहे. मुंबईचा हिरे व्यापार गुजरातला नेण्यासाठी परवानगी दिल्यास या व्यापारावरील नियंत्रण जाण्याच्या भीतीने पालनपुरी जैन व्यापार्‍यांचा मात्र या सर्व हालचालीस तीव्र विरोध आहे.

सुरतचा हट्ट का?
पिढ्यान्पिढ्या हिरे व्यवसाय करणार्‍यांसाठी मुंबई हे आता घरचे ठिकाण झाले आहे. बहुतांश व्यापार्‍यांची मोक्याच्या ठिकाणी घरे असून मुलांचे शिक्षणही सुरू आहे. विशेष करून पालनपुरी जैन मुंबईत स्थायिक आहेत, परंतु काठियावाडी पटेल मूळचे सुरतचे असून त्यांना तेथून व्यवसायासाठी मुंबईला वारंवार यावे लागते आणि ते टाळण्यासाठी सुरतला हिरे व्यापार स्थलांतरित करून तेथूनच हिरे निर्यात करण्याचा त्यांचा आग्रह आहे.

ज्वेलर्स आणि कटर्स
हिरे व्यापाराशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे 10 हजारांच्या आसपास लहान-मोठे ज्वेलर्स तसेच मालाड, दहिसर या उपनगरांमध्ये हिर्‍यांना पैलू पाडणारे शेकडो कारागीर (कटर्स) जोडलेले आहेत. ज्वेलर्स अशा वेळी चीनच्या बाजारपेठेतून आयातीला प्राधान्य देऊ शकतात. सुरतेत जाऊन विक्रीयोग्य माल बघणे शक्य होणार नाही.

वाहतूक, हॉटेल उद्योग
भारत डायमंड बोर्समध्ये व्यवसायानिमित्त दिवसाला चार ते पाच लाख ग्राहक वा त्यांचे प्रतिनिधी भेट देतात. यामुळे या परिसरातील वाहतूक, हॉटेल व संबंधित उद्योगालाही खात्रीलायक उत्पन्न मिळते. हे उत्पन्नही जवळपास बंद होईल.

रोजगार
या बोर्समधील विविध कार्यालयांत कार्यरत असलेल्या महिला आपल्या कौटुंबिक अडचणीमुळे जाऊ शकणार नाहीत. तसेच अनेक महिला आपापल्या घरी राहूनही हिरे निर्मिती वा व्यापाराशी संबंधित छोटी-मोठी कामे करतात. त्यांचाही रोजगार जाईल. भारत डायमंड बोर्समध्ये किमान तीन लाख लोकांना थेट रोजगार मिळाला असून यापैकी बहुसंख्य लोकांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळू शकते.

रिअल इस्टेट
इमारत बांधकाम आणि फर्निचरमधील गुंतवणूक 50 हजार कोटी असून येथील महागडी कार्यालये भाड्याने किंवा विकत घ्यायला एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळण्याची शक्यता कमीच आहे.
मराठी तरुणांना पैलू पाडण्याची गरज
हिर्‍यांना पैलू पाडण्याचा उद्योग प्रदूषणकारी नाही आणि त्यासाठी जागाही कमी लागते. यासाठी पदवीची नाही तर कौशल्याची गरज लागते. त्याचा विचार करता सरकारने नवीन केंद्र स्थापन करून त्यामध्ये प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करू न दिल्यास 15 लाख नवीन रोजगार उपलब्ध होतील. मराठी तरुणांना हे प्रशिक्षण दिल्यास आणि मराठी तरुणांना प्राधान्य देण्याचे बंधन घातल्यास बेकारीचा प्रश्न संपू शकतो.

हिरे उत्पादन झोन उभारावा
विशेष आर्थिक क्षेत्राच्या धर्तीवर राज्यात हिरे उत्पादनासाठी स्वतंत्र हिरे उत्पादन झोन तयार करावा. मुंबईतच उत्पादन सुरू झाले तर खरेदीसाठी आलेल्या बड्या ग्राहकांना निर्मिती केंद्रात नेऊन हिरे दाखवणेही निर्मात्यांना शक्य होईल.

हिरे व्यापार मुंबईहून सुरतेत स्थलांतराला काहींचा विरोध तर काही जणांचा पाठिंबा
स्थलांतराला विरोध
भारत डायमंड बोर्समध्ये कार्यालये खरेदीसाठी 10 हजार प्रति चौरस फूट हा दर होता. सर्व व्यापार्‍यांनी मिळून किमान 25 हजार कोटी खर्चून कार्यालये खरेदी केली. फर्निचर व अंतर्गत सजावटीवर किमान 10 हजार कोटी खर्च करण्यात आले. अशाप्रकारे किमान 50 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. स्थलांतर करणे म्हणजे ही सर्व गुंतवणूक पूर्ण वाया घालवण्यासारखे आहे.
- संजय शहा, मालक, नाईन डिअ‍ॅम कंपनी
हिरे कटिंगचे 90 % काम गुजरातेते होते.स्थलांतराचा कटर व्यवसायावर परिणाम होणार नाही. हेमेंद्र जेसा, अध्यक्ष, कटर्स असो.
स्थलांतरितसाठी काही ठरावीक व्यक्तींनी पुढाकार घेतला आहे. मुंबईवर परिणाम होणार नाही : जिग्नेश मेहता, एमडी. डिव्हाइन सॉलिटेअर
मुंबईतील राहणीमानाच्या खर्चाच्या तुलनेत गुजरातमध्ये हा खर्च कमी आहे. सर्बाश दास महापात्रा, कार्यकारी संचालक, ऑल इंडिया जेम्स, ज्वेलरी ट्रेड फेड.
मुंबईच्या तुलनेत गुजरातेत व्यवसाय करणे कमी खर्चाचे आहे. केंद्र झाल्यास मुंबईतील 20 % व्यापारी स्थलांतरित होऊ शकतात. नव्या केंद्राबाबत शंका आहे. नरेश मेहता, सचिव, भारत डायमंड बोर्स

सुरतेत कार्यालय, घरांचे दर तसेच कामगारांचे वेतनही कमी आहे. तसेच वाहतूक कोंडीची समस्या नाही. गुजरातमधील प्रस्तावित हिरे केंद्रासाठी जमीन अद्याप मिळालेली नाही. सुरतला जाण्यासाठी 60 टक्के व्यापारी तयार आहेत. हिरे उत्पादनात सुरतच आघाडीवर आहे. मावजी पटेल, किरण जेम्स