आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mumbai Pune Employment Creation Decline, Companies Prefere Contract

मुंबई-पुण्यातली रोजगारनिर्मिती घटली, कंत्राटीकरणाला कंपन्यांचे प्राधान्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - हमखास रोजगार देणारी शहरे म्हणून फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील तरुणाई मुंबई-पुण्याकडे धावत असते, परंतु मुंबईची ‘स्वप्ननगरी’ आणि पुण्याची ‘आयटी सिटी’ नव्याने नोक-या देण्यात मागे पडत असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. मुंबईमधील रोजगारनिर्मिती तब्बल 28 टक्क्यांनी, तर पुण्यातील नोक-यांच्या संधीमध्ये 17 टक्क्यांची मोठी घसरण झाली आहे. देशभरातील रोजगारनिर्मितीत एकट्या मुंबई शहराचा वाटा 14 टक्क्यांचा आहे. तो 10 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. देशात सर्वाधिक रोजगार देणारे शहर ही आपली ओळख दिल्लीने मात्र टिकवून ठेवली आहे. देशातील एकूण रोजगारांपैकी दिल्लीने 27 टक्के नोक-या दिल्या. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचेम)ने केलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी पुढे आली आहे.

यंदाच्या आर्थिक तिमाहीत पुण्यात फक्त साडेआठ हजार नोक-या निर्माण झाल्या. मुंबई नगरी 13 हजार 100 बेकारांना नोक-या देऊ शकली. पुण्या-मुंबईप्रमाणेच कोलकाता, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद या महानगरांमधल्या नोक-यासुद्धा घटल्या. ‘असोचेम’चे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी सांगितले, ‘बांधकाम, अभियांत्रिकी, रिटेल, ऑटोमोबाइल या पारंपरिक क्षेत्रातल्या नोेक-या मात्र कमी झाल्या आहेत. जागतिक आर्थिक मंदीमुळे शहरांमधील नोक-यांची निर्मिती घटली आहे. नोकरी देण्यापेक्षा कंत्राटी पद्धतीने काम करून घेण्याकडे कंपन्यांचा कल वाढतोय.’ देशातल्या 56 शहरांमधल्या तीन हजारांहून अधिक कंपन्यांमधला तपशील अभ्यासून ‘असोचेम’ने माहिती जाहीर केली.

अनेक क्षेत्रांकडून आशा या क्षेत्रांनी दिल्या नोक-या आयटी, हार्डवेअर क्षेत्राने सर्वाधिक 32 टक्के रोजगार निर्माण केले. नोक-या देण्यात दुसरा क्रमांक (18 टक्के) बॅँकिंग, अर्थविषयक सेवा आणि विमा क्षेत्राचा आहे. शिक्षण क्षेत्रातून तिस-या क्रमांकाची (7 टक्के) रोजगार निर्मिती झाली आहे. त्याखालोखाल जाहिरात, इव्हेंट मॅनेजमेंट, टेलिकॉम आणि हॉटेलिंग या क्षेत्रांमधून मोठ्या प्रमाणात नोक-या मिळाल्या आहेत.

‘टू टायर’ शहरांमध्ये नोक-या
महानगरातल्या नोक-या घटल्या असल्या तरी द्वितीय श्रेणीच्या (‘टू टायर सिटीज’) शहरात रोजगारनिर्मितीचे चित्र आशादायक आहे. लखनऊमध्ये तब्बल 58 टक्के नोक-या नव्याने उपलब्ध झाल्या. कानपूरमध्ये हेच प्रमाण 53 टक्के, तर कोची (केरळ) येथे 45 टक्के आहे. नागपूर, गांधीनगर, जयपूर या शहरातली रोजगारनिर्मितीही वाढली आहे. तुलनेने सुरत, इंदूर आणि भोपाळ या ‘टू टायर’ शहरांची नोक-या देण्याची क्षमता घटल्याचे दिसले आहे.