आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समजावून घ्या कमॉडिटी बाजार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रश्न- ‘कमॉडिटी एक्स्चेंज’ काय असते?
भांडवली बाजारातील स्टॉक एक्स्चेंज अर्थात शेअर बाजाराप्रमाणे कमॉडिटी एक्स्चेंज हे कमॉडिटीजमध्ये (विविध जिनसांचे) वायदे- सौदे करणा-या विविध कंपन्या आणि उद्यम आस्थापनांचे संघटित मंडळ आहे. नव्या धाटणीची राष्ट्रीय स्तरावर कार्यरत झालेल्या एक्स्चेंजेसचे कंपनीकरण/ डिम्युच्युअलायझेशन केले गेले आहे. आजघडीला भारतात तीन राष्ट्रस्तरीय मान्यता असलेली तीन एक्स्चेंजेस आहेत, तर 22 प्रादेशिक एक्स्चेंजेस आहेत. राष्ट्रीय एक्स्चेंजेसमध्ये मुंबईतील मल्टी कमॉडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया (एमसीएक्स), नॅशनल कमॉडिटीज अँड डेरिव्हेटिव्हज एक्स्चेंज ऑफ इंडिया आणि नॅशनल मल्टी कमॉडिटीज एक्स्चेंज आदींचा समावेश होतो.
प्रश्न - कमॉडिटी म्हणजे काय?
ज्या वस्तूला व्यापारी मूल्य आहे आणि जिची निर्मिती, खरेदी, विक्री आणि उपभोग केला जाऊ शकतो अशा सर्व जिनसांना ‘कमॉडिटी’ म्हणता येईल. या जिनसा प्रामुख्याने मूळ कच्च्या व प्रक्रिया न केलेल्या स्वरूपातील असतात. पण देशाच्या प्राथमिक क्षेत्रातून (कृषी-ग्रामोद्योग क्षेत्र) उत्पादित आणि रचित वस्तूंचेही कमॉडिटी एक्स्चेंजवर व्यवहार केले जातात. भारतात व्यवहार होणाºया कमॉडिटीजमध्ये मौल्यवान धातू, लोहयुक्त व बिगर लोहयुक्त धातू, मसाले, डाळी, बागायती पिके, साखर आणि अन्य मृद जिनसांचा समावेश होतो.
प्रश्न - कमॉडिटीज मार्केटमध्ये सहभागी असणारे विविध घटक कोणते?
ढोबळमानाने या घटकांचे हेजर्स, आर्बिट्रेजर्स आणि स्पेक्युलेटर्स असे वर्गीकरण करता येईल. अन्य शब्दांत सांगायचे झाल्यास उत्पादक, व्यापारी, शेतकरी, निर्यातदार आणि गुंतवणूकदार हे कमॉडिटी मार्केटमधील मुख्य सहभागीदार आहेत.
प्रश्न - कमॉडिटी बाजारात ट्रेडिंग कसे केले जाते?
शेअर बाजारातील ऑनलाइन ट्रेडिंगप्रमाणेच कमॉडिटी बाजारातही प्रामुख्याने ऑनलाइन प्रणालीअंतर्गतच व्यवहार होतात. हे एक मागणीप्रवण, पारदर्शक ट्रेडिंग व्यासपीठ आहे, जे विविध सहभागीदारांना इंटरनेट, व्हिसॅट आणि देशभरात पसरलेले सदस्य किंवा सब-ब्रोकर्सच्या माध्यमातून उपलब्ध होते.
प्रश्न - ‘वायदे करार’ (फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट)चा अर्थ काय?
हा एक दोन पक्षांतर्गत विहित प्रमाणातील आणि निश्चित गुणवत्तेच्या कमॉडिटीजसाठी भविष्यातील ठरावीक कालावधीसाठी व (करार करतेवेळी मान्य केलेल्या) ठरलेल्या किमतीवर होणारा करार आहे. असे व्यवहार हे मुख्यत: सुनियमित कमॉडिटी एक्स्चेंजेसवरच केले जातात.
प्रश्न- स्पॉट मार्केट आणि फ्युचर्स मार्केटमधील फरक काय?
स्पॉट मार्केटमध्ये कमॉडिटीजची भावाची बोली लावून प्रत्यक्षात खरेदी आणि विक्री होते आणि ज्याची परिणती कमॉडिटीजचा ताबा (डिलिव्हरी) घेण्यात होते. त्याउलट फ्युचर्स मार्केटमध्ये कमॉडिटीजचा प्रत्यक्ष ताबा न घेता त्यांची खरेदी व विक्री केली जाते. फ्युचर्स मार्केटचे व्यवहार हे प्रमाणबद्ध करार-मदाराने म्हणजे कमॉडिटीजची विशिष्ट प्रतवारी, प्रमाण आणि आवकीची पद्धत या बाबी ठरवून केली जातात आणि या करारांच्या पूर्ततेची हमी नियंत्रित कमॉडिटी एक्स्चेंजेसद्वारे दिली जाते.
प्रश्न - हेजिंगचा अर्थ काय?
प्रत्यक्ष बाजारपेठेच्या विपरीत फ्युचर्स व ऑप्शन्स मार्केटमध्ये घेतल्या जाणा-या सौदा स्थितीला ‘हेजिंग’ म्हटले जाते. असे केल्याने दरातील अतार्किक फेरबदलांमुळे संभवणा-या जोखमीपासून संरक्षण प्राप्त होते. अशी पद्धत सुरू करण्याचा हेतू एका बाजारपेठेत होणा-या नुकसानीला अन्य बाजारपेठेच्या माध्यमातून भरून काढले जाण्याची मुभा मिळावी असा आहे.
prasadkerkar73@gmail.com