आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परताव्यात यंदा शेअर बाजाराची सोन्यावर मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - परतावा देण्यात यंदा सोन्यापेक्षा शेअर बाजार वरचढ ठरला आहे. मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) 30 समभागांचा सेन्सेक्सने 2014 मध्ये आतापर्यंत 22.76 टक्के परतावा दिला आहे. याउलट सोन्याच्या किमतीत याच काळात पाच टक्के घसरण झाली आहे. चांदीच्या बाबतीतही चित्र फारसे उत्साहवर्धक नसून रजत धातूने आतापर्यंत केवळ 2.38 टक्के परतावा दिला आहे.
बाजार तज्ज्ञांच्या मते, यंदाचे वर्ष भारतीय शेअर बाजाराच्या दृष्टीने अत्यंत चांगले राहील. देशातील गुंतवणूकदारांची मानसिकता तर बदलली आहेच, विदेशी गुंतवणूकदारही सातत्याने गुंतवणुकीत वाढ करत आहेत. सर्वसाधारणपणे सोने आणि शेअर्सच्या किमती एकमेकांच्या विरोधाभासी असतात. जेव्हा शेअर बाजारात अस्थैर्य असते तेव्हा लोक सोन्यात जास्त गुंतवणूक करतात. महागाईच्या जोखमीपासून वाचण्याचा सोने हा एक उत्तम मार्ग मानला जातो. दशकभर शेअर बाजारपेक्षा जास्त परतावा देणारे सोने मागील दोन वर्षांपासून समभागांपेक्षा पिछाडीवर पडले आहे. मागील वर्षअखेरीस 31 डिसेंबर रोजी सोने 29800 रुपये तोळा होते, तर चांदी 43,755 रुपये किलो होती. 28 जुलै रोजी सोने 28,370 रुपये तोळा आणि चांदी 44,800 रुपये किलो होती.

विदेशी गुंतवणूकदारांचा वाटा
दुसरीकडे सेन्सेक्स 31 डिसेंबर 2013 रोजी 21,170.68 या पातळीत होता. तर 28 जुलै 2014 रोजी 25,991.23 वर बंद झाला. चार दिवसांपूर्वी 25 जुलै रोजी सेन्सेक्सने 26,300.17 ही सर्वोच्च पातळी गाठली होती. सेन्सेक्सच्या या कामगिरीत विदेशी गुंतवणूकदारांचा मोठा वाटा आहे. यंदाच्या कॅलेंडर वर्षात विदेशी गुंतवणूकदारांनी 1.53 लाख कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे.

गतवर्षीही सोने पिछाडीवर
मागील वर्षातही सेन्सेक्सने गुंतवणूकदारांना 9 टक्के परतावा दिला होता. तर सोन्याच्या किमती 3 टक्क्यांनी आणि चांदी 24 टक्क्यांनी घसरली होती. वर्ष 2012 मध्ये सेन्सेक्सने 25 टक्के वाढ दर्शवली होती. सोन्याच्या 12.95 टक्के वाढीपेक्षा ही वाढ दुप्पट होती. तेव्हा चांदीमध्ये 12.84 टक्के वाढ झाली होती.