आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीपुढे 'मूर्ती' इफेक्ट फिका; सेन्सेक्सची 150 अंकांनी गटांगळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नारायण मूर्ती यांच्याकडे इन्फोसिसची सूत्रे आल्यामुळे सकाळच्या सत्रात बाजारात आलेला खरेदीचा उत्साह औट घटकेचा ठरला. जागतिक शेअर बाजारातील मरगळ, औद्योगिक कामगिरीने केलेली निराशा आणि रुपयाचे सुरू असलेले लोळण सत्र यामुळे वैतागलेल्या बाजारात झालेल्या विक्रीमध्ये सेन्सेक्सने 150 अंकांची गटांगळी खात एक महिन्यांची नीचांकी पातळी गाठली.

सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने 19,859.22 अंकांची कमाल पातळी गाठली होती, परंतु जागतिक बाजारातील नरमाईनंतर सेन्सेक्स तातडीने घसरून 19,541.97 अंकांच्या पातळीवर आला. जागतिक शेअर बाजारातील मरगळीबरोबरच ‘एचएसबीसएचच्या सर्वेक्षणात उत्पादन क्षेत्राने मार्च 2009 पासून पहिल्यांदाच मे महिन्यात मोठी घट नोंदवल्यामुळे बाजाराचा मूड आणखीनच गेला.

डॉलरच्या समोर साष्टांग दंडवत घालत रुपयानेदेखील 11 महिन्यांच्या 56.73 या नीचांकी पातळीवर आल्याचादेखील बाजारावर नकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे तेल आणि वायू, ऊर्जा, ग्राहकोपयोगी वस्तू आणि भांडवली वस्तू समभागांवर विक्रीचा जास्त ताण आला. परिणामी दिवसअखेर सेन्सेक्स 149.82 अंकांनी घसरून 19,610.48 अंकांच्या एका महिन्याच नीचांकी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 46.55 अंकांनी घसरून 5939.30 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

गेल्या महिनाभरात डॉलरच्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली असून त्याचाही मोठा परिणाम समभाग बाजारपेठेवर होत आहे. त्यातून उत्पादन क्षेत्रातील वाढ मंदावल्याची भर त्यात पडली असल्याचे मत इव्हेंचर ग्रोथ अँँड सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख मिलन बाविशी यांनी व्यक्त केले.

टॉप लुझर
हिरो मोटोकॉर्प, बजाज ऑटो, ओएनजीसी, सन फार्मा, एचडीएफसी, मारुती सुझुकी, रिलायन्स, टीसीएस, एचडीएफसी बॅँक, एनटीपीसी, टाटा पॉवर, आयटीसी, एल अँड टी.

निफ्टीवर विक्रीचा ताण
राष्ट्रीय बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 6,120 अंकांच्या पातळीच्यावर राहण्यास असर्मथ ठरल्यामुळे सोमवारी विक्रीचा ताण जाणवला, परंतु आता ताण यापुढे आणखी तीव्र होण्याची शक्यता ‘आयआयएफएल’चे संशोधनप्रमुख अमर अंबानी यांनी व्यक्त केली.

वाहन, तेल शेअर्सना फटका
वाहन कंपन्यांनी मे महिन्यात विक्रीमध्ये फारशी समाधानकारक कामगिरी केलेली नाही. त्याच्याच जोडीला पेट्रोलचे दर वाढल्याचा बाजारावर परिणाम झाला. दुचाकी सर्वच वाहन कंपन्यांच्या समभाग खरेदीचे ब्रेक फेल झाले. त्यापाठोपाठ तेल आणि वायू व ऊर्जा समभागांनादेखील विक्रीचा दणका मिळाला.

इन्फोसिस तेजीत
कार्यकारी अध्यक्ष या नात्याने नारायण मूर्ती यांच्याकडे पुन्हा एकदा इन्फोसिसची सूत्रे आल्याचे बाजाराने स्वागत केले आहे. मूर्तींमुळे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिसच्या कामगिरीत आणखी सुधारणा होण्याच्या बाजाराच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. नारायण मूर्ती इफेक्टमुळे सकाळच्या सत्रात झालेल्या तुफान खरेदीत इन्फोसिसच्या समभाग किमतीत 4.4 टक्क्यांनी वाढ होऊन ती 2513.95 रुपयांवर बंद झाली, परंतु मधल्या सत्रात तिने 2624.9 रुपयांची कमाल पातळी गाठली होती. एप्रिलअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत इन्फोसिसने बाजाराची निराशा केली होती, परंतु मूर्ती यांच्या आगमनामुळे इन्फोसिसच्या समभागांवर सकारात्मक परिणाम होण्याचा अंदाज बाजारातील विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.