आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई निर्देशांक रोख्यांवर गुंतवणूकदारांच्या उड्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सोन्यातील गुंतवणूक दुसरीकडे वळवून सोन्याच्या वाढत्या मागणीला आळा घालण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने राबवलेल्या महागाई निर्देशांकावर आधारित रोख्यांची संकल्पना गुंतवणूकदारांनी चांगलीच उचलून घेतली आहे. या विक्रीला जवळपास एक हजार कोटी रुपयांच्या रोख्यांना बोली मिळाली. त्यामुळे मंगळवारच्या पहिल्याच दिवशी या रोख्यांचा जवळपास चारपटीपेक्षा जास्त भरणा झाला आहे.

सोन्यातील वाढत्या गुंतवणुकीला लगाम घालण्यासाठी प्रत्येक महिन्यात महागाईशी निगडित रोखे आणण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेने मागील महिन्यात केली होती. त्याप्रमाणे मंगळवारी हे महागाई निर्देशांकावर आधारित रोखे बाजारात आणण्यात आले. या रोख्यांमध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात 15 हजार कोटी घरगुती बचत आकर्षित होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दहा वर्षे परिपक्वता कालावधी असलेल्या या पहिल्या ‘महागाई निर्देशांकावर आधारित सरकारी रोखे 2023’ला पहिल्या दिवशी 4,616 कोटी रुपये मूल्याच्या एकूण 167 स्पर्धात्मक बोली आल्या होत्या; परंतु त्यापैकी 985.94 कोटी रुपयांच्या 26 बोली स्वीकारण्यात आल्या. त्याचबरोबर किरकोळ आणि मध्यम गुंतवणूकदारांकडून आलेल्या 14.06 कोटी रुपयांच्या आठ बिगर स्पर्धात्मक बोलीदेखील स्वीकारण्यात आल्या.

चालू आर्थिक वर्षामध्ये 12 ते 15 हजार कोटी रुपये मूल्याचे आणि दहा वर्षांचा परिपक्वता कालावधी असलेले महागाई निर्देशांकावर आधारित रोखे आणण्याची योजना सरकारने जाहीर केली होती. या रोख्यांची पहिली मालिका ही सर्व गटांतील गुंतवणूकदारांसाठी खुली आहे. आॅक्टोबरात येणारे रोखे मात्र किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

रोख्यांची वैशिष्ट्ये
० 2013- 14 वर्षासाठी असलेल्या महागाई निर्देशांक रोख्यांचा पहिला टप्पा 1000 ते 2000 कोटी रुपयांचा राहील.
० परिपक्वता कालावधी 10 वर्षे
० या रोख्यांचा एकूण आकार 12 हजार ते 15 हजार कोटी रु.

फायदा काय?
निश्चित व्याजदर, रोख्यांमध्ये गुंतवलेली मुद्दल रक्कम घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईशी जोडणार, मुद्दल आणि व्याज रक्कम दोन्हीला महागाई संरक्षण, परिपक्वता कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुद्दल किंवा दर्शनी मूल्य या दोन्हींपैकी जी जास्त त्यानुसार रक्कम अदा.