आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजाराची सलग दुसर्‍या आठवड्यात चढती कमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॅँका, सार्वजनिक कंपन्या आणि रिफायनरी समभागांची सातत्याने खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्सने सलग दुसर्‍या आठवड्यात चढती कमान कायम ठेवली. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी ठोस उपाययोजना जाहीर केल्याचाही बाजारावर सकारात्मक परिणाम होऊन सेन्सेक्स साप्ताहिक आधारावर 650 अंकांची वाढ नोंद करत 19,270.06 अंकांची तीन आठवड्यातील कमाल पातळी बंद झाला.

आर्थिक वृद्धीला संजीवनी तसेच भांडवलाचा ओघ आकर्षित करण्यासाठी रघुराम राजन यांनी अनेक उपाययोजना जाहीर केल्यामुळे बाजारावर ‘राजन इफेक्ट’ स्पष्ट जाणवत होता. बॅँकांसाठी विदेशातून कर्ज उभारण्याच्या र्मयादेत वाढ करतानाच सरकारी रोख्यांमधील बॅँकांची गुंतवणूक कमी होण्याची गरज आहे, असे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे नवीन शाखा सुरू करण्यासाठी बॅँकांना रिझर्व्ह बॅँकेच्या परवानगीची गरज नसून नवीन बॅँक परवान्याचे वितरण पुढील वर्षाच्या जानेवारीत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. याचा परिणाम म्हणजे बॅँकां निर्देशांकात 9.99 अंकांची दणदणीत वाढ झाली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 18,691.83 अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. परंतु तो फारसा तग धरू शकला नाही. सिरियावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्याच्या वृत्तामुळे मंगळवारी रुपया घसरून तो 68 या नव्या नीचांकावर आला. त्यामुळे बाजारात झालेल्या जोरदार विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स 18,166.17 अंकांवर आला. परंतु इस्रायल व अमेरिकेने संयुक्तपणे क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचे आलेले वृत्त आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात सुधारणा झाल्यामुळे नंतर सेन्सेक्स सावरून पुन्हा 19,293.96 अंकांच्या पातळीवर आला. साप्ताहिक आधारावर सेन्सेक्स 650.34 अंकांनी वाढून 19,270.06 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या दोन आठवड्यांत सेन्सेक्समध्ये 750 अंकांची चांगली वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 208.60 अंकांनी वाढून 5680.40 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

राजन यांच्या सुधारणावादी भूमिकेबरोबरच एफआयआयने पुन्हा भांडवल बाजाराची वाट पकडत नव्याने खरेदी सुरू केल्यामुळे गुंतवणूकदारांत उत्साह संचारला. उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार सहा सप्टेंबरपर्यंत विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी 1,782.81 कोटी समभागांची निव्वळ खरेदी केली आहे.

टॉप गेनर्स : आयसीआयसीआय बॅँक, भेल, ओएनजीसी, कोल इंडिया, स्टेट बॅँक, टाटा स्टील, टाटा मोटर्स, एचडीएफसी, भारती एअरटेल, सिप्ला.

टॉप लुझर्स : टाटा पॉवर, सेसा गोवा, हिरो मोटोकॉर्प, विप्रो, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, टीसीएस, महिंद्र अँड महिंद्र.

डॉलरसमोर घरंगळणार्‍या रुपयाच्या दोलायमान स्थितीवर बाजाराची दिशा ठरायची. कोटक सिक्युरिटीजचे प्रमुख संशोधक दीपेन शहा यांनी रुपयाला बळकटी देण्यासाठी नव्याने जाहीर केलेल्या उपाययोजना आणि वित्तीय सुधारणा यामुळे बाजार आणखी झेप घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.